[ad_1]
वसमत तालुक्यातील धामणगाव येथे शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत ११ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. १४ दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धामणगाव शिवारातील गट क्रमांक १९५, गट क्रमांक १९६ व गट क्रमांक १९७ यामध्ये मारकोळे व पारखे यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहे. सुमारे २० गुंठे जमीनीसाठी वाद होत असून त्यातून त्यांच्यामध्ये नेहमीच कुरबुरी होत होत्या. शनिवारी ता. १० पुन्हा एकदा वादाला तोंड फुटल्यामुळे दोन्ही गटांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात अर्ज दिला होता. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार भगीरथ सवंडकर यांनी दोन्ही गटांना समजाऊन सांगितले तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.
दरम्यान, मंगळवारी ता. १३ सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा वाद उफाळून आला. यामध्ये दोन्ही बाजूंनी काठ्या, लोखंडी रॉडने हाणामारीला सुरवात झाली. या हाणामारीमध्ये दुर्गाजी पारखे, रामेश्वर पारखे, लक्ष्मी पारखे, मिरा पारखे, रोहिदास पारखे हे जखमी झाले. तर दुसऱ्या गटातील गणेश मारकोळे, विभुती मारकोळे, किशन मारकोळे, राजेश मारकोळे, सुदामा मारकोळे, चंद्रकला वाघमारे हे जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, उपनिरीक्षक प्रविण आगलावे, जमादार भगीरथ सवंडकर, बालाजी जोगदंड, रेखा मुंढे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.
खाली पाहा घटनेचा व्हिडिओ
[ad_2]