[ad_1]
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तथा दहिसर विभागसभा प्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे तेजस्वी यांची पक्षांतर्गत नाराजी दूर झाल्याचा दावा केला जात आहे.
.
तेजस्वी घोसाळकर ह्या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या स्नुषा आहेत. त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हमध्ये निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. पण तेजस्वी यांनी मंगळवारी अचानक स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळून ठाकरे गटाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. आगामी मुंबई महापालिकेच्या तोंडावर हा घटनाक्रमक घडल्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ माजली होती. स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी त्यांना तत्काळ भेटण्याचा सांगावा धाडला होता. त्यानुसार, तेजस्वी यांनी बुधवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत बराचवेळ चर्चा झाली.
मी कोणतीही गद्दारी केली नाही
उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर तेजस्वी यांनी आपण कोणतीही गद्दारी केली नसल्याचे सांगितले. मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. माझ्या ज्या काही तक्रारी होत्या, त्या मी त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावर त्यांनी आपली उत्तरे दिली. या प्रकरणी अजून काही उत्तरे येणे बाकी आहे. त्यामुळे मी यावर फार काही बोलणार नाही. पण मी गद्दारी केली नाही. अद्याप कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. माझी नाराजी दूर झाली किंवा नाही हे तुम्हाला लवकरच समजेल, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानामुळे त्यांची नाराजी काहीअंशी दूर झाल्याचे मानले जात आहे.
विभाग प्रमुख व विभाग संघटकांना मी समस्यांविषयी पत्र दिले होते. या समस्या स्थानिक पातळीवर सोडवल्या जातात. पण माझ्या पत्रावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे मला उद्धव ठाकरे यांच्याकडे यावे लागले, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
तेजस्वी घोसाळकर नाराज असल्याची चर्चा
उल्लेखनीय बाब म्हणजे तेजस्वी घोसाळकर या सध्या ठाकरे गटात नाराज आहेत. त्यामुळे त्या भाजप किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा मुंबईच्या राजकारणात रंगली आहे. पण तेजस्वी यांनी स्वतःच आपण याविषयी कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
हे ही वाचा…
NCP चे दोन्ही गट एकत्र येण्याचे वृत्त खोटे:अमोल मिटकरी यांची स्पष्टोक्ती; म्हणाले – दोन्ही गट एकत्र येत असतील तर आमच्या काही अटीशर्थी
अकोला – राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्यासंबंधीच्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बातम्यांत कोणतेही तथ्य नाही. त्या बातम्या पेरण्यात आल्या आहेत. पण हे दोन्ही पक्ष एकत्र येत असतील तर आमच्या काही अटीशर्थी आहेत, असे ते म्हणालेत. दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा प्रत्यक्षात येणार नसल्याचा दावा करत पवार कुटुंबाला खोचक टोला हाणला आहे. वाचा सविस्तर
[ad_2]