[ad_1]
औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी बहिणाराव येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप करून संतप्त महिलांनी नळ योजनेचे पाईप उखडून फेकून दिले. त्यानंतर गुरुवारी ता. १५ जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
.
औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी बहिणाराव हे सुमारे १५०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. सुमारे ८० लाख रुपये अंदाजपत्रक असलेल्या या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरवात झाली आहे. मात्र या योजनेसाठी घेण्यात आलेल्या विहीरीला पाणी नाही शिवाय गावातील सांडपाण्याच्या नाल्याच्या ठिकाणीच विहीर खोदण्यात आले असून सदर पाणी पिल्यास गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. याशिवाय या योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
या संदर्भात महिलांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर कंत्राटदाराने आरेरावीची भाषा वापरल्याचा आरोपही महिलांनी केला आहे. सदर योजनेचे निकृष्ठ काम बंद करण्याची मागणी करीत संतप्त महिलांनी चक्क नळ योजनेचे पाईप उखडून फेकून दिले.
त्यानंतर आज महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडामोर्चा काढला. नळ योजनेच्या कामाची चौकशी करावी तसेच गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांनी केली. तसेच सिध्देश्वर धरण येथून पिण्याचे पाणी उपलब्ध करावे अशी मागणी महिलांनी केली. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाणार अशी भुमीका त्यांनी घेतली. तसेच नळ योजनेचे काम बंद ठेवण्याची मागणी महिलांनी केली. महिलांचा संताप पाहून काम बंद ठेवण्याचे आश्वासन ग्रामपंचायत कार्यालयाने दिले आहे. त्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करणार – ग्रामसेवक
गावात पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने दोन विहीरींचे अधिग्रहण केले जाणार असून ग्रामपंचायत जवळील विंधन विहीरीची दुरुस्ती करून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांच्या मागणीनुसार गावातील नळ योजनेचे काम बंद ठेवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, अशी माहिती सावळी बहिणारावचे ग्रामसेवक जी पी हलबुर्गे यांनी यासंबंधी दिली आहे.
[ad_2]