मार्डी येथे विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

0

मार्डी (माण) : मार्डी (ता. माण) येथील संजय देशमुख यांच्या शेतात नवीन विहिरीचे बांधकाम सुरू आहे. यावेळी कठड्यावरून तोल जाऊन विहिरीत पडल्याने वृद्धाचा मृत्यू झाला.
ही घटना आज (दि.१३) सकाळी घडली. रावसाहेब देसाई (वय ६५) असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर दगडी कठड्याचे काम मागील ८ दिवसांपासून सुरू आहे. देशमुख यांच्या भावकितील लोकच बांधकाम करत होते. आज नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास बांधकामास लोक विहिरीवर पोहचले होते. काहीजण कपडे बदलत होते. त्यावेळी रावसाहेब देसाई घमेले व खोरे घेण्यासाठी कठड्यावरून चालत जात असताना त्यांचा अचानक तोल जाऊन विहिरीत पडले. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे सर्वजण घाबरले.

त्यातील दोघांनी लगेच पाण्यात उड्या मारून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण पाणी जास्त असल्याने अडथळा येऊ लागला.

त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आणि गावातील काही युवक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here