[ad_1]
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यात चोरी, जबरी चोरी फसवणूक यासारखे दहा गुन्हे असलेल्या सेनगाव तालुक्यातील हनकदरी येथील एका गुन्हेगारास एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता २८ दिले आहेत.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील हनकदरी येथील नागोराव शिरामे (२७) हा मागील काही दिवसापासून हिंगोली शहरासह जिल्ह्यातील पोलिस ठाणे अंतर्गत सतत चोरी, जबरी चोरी, फसवणूक यासारखे गुन्हे करत होता. त्याच्यावर हिंगोली शहर, आखाडा बाळापूर, नरसी नामदेव, सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.याशिवाय पुणे जिल्ह्यातील आळेफाटा या ठिकाणीही गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. त्याला वारंवार सूचना दिल्यानंतरही त्याच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे त्याच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता.
त्यावरून पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल पाठविण्याचे सूचना पोलिस उपाधीक्षक कार्यालयाला दिल्या होत्या. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुरेश दळवे यांनी नागोराव याच्याविरुद्ध असलेल्या गुन्ह्यांची सविस्तर माहिती व अहवाल पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे पाठवला. सदर अहवाल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांनी नागोराव शिरामे यास एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी या आदेशानुसार पुढील कारवाई सुरू केली आहे.
[ad_2]