[ad_1]
भंडारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक लक्षवेधी आणि बहुप्रतीक्षित निवडणूक – दि भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लि. संचालक मंडळाची निवडणूक – सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, जिल्हाभरातील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये प्रचंड
.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या संस्थांची संख्या लक्षणीय आहे. तुमसर (६२), मोहाडी (४३), पवनी (४९), साकोली (४०), लाखनी (५५) आणि लाखांदूर (४८) येथून मोठ्या संख्येने संस्थांनी सहभाग नोंदवला असून, त्यामुळे तालुकास्तरावरही जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत ८० औद्योगिक संस्था, १६ प्रक्रिया संस्था, १९४ दुग्ध संस्था, ९९ मच्छीमार संस्था, १०७ पगारदार सहकारी पत संस्था, १६० नागरी सहकारी पत संस्था आणि ८६ वैयक्तिक संस्थांचे प्रतिनिधी सक्रिय सहभाग घेत आहेत. सहकार क्षेत्रातील विविध घटकांच्या सहभागामुळे ही निवडणूक अधिक व्यापक आणि बहुआयामी ठरणार आहे.
दरम्यान, प्राथमिक मतदार यादीनंतर प्राप्त झालेल्या ६५ आक्षेपांवर नागपूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयात २८ मे रोजी सुनावणी झाली असून, त्यावरील अंतिम निर्णय २ आणि ३ जून रोजी दिला जाणार आहे. या निर्णयानंतर ६ जून रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रियेचा अधिकृत शुभारंभ होईल.
विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत एका पेक्षा अधिक संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांचा सहभाग तसेच राजकीय नेत्यांचा सक्रीय हस्तक्षेप यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध गट-तटांत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
यंत्रणांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून, जिल्ह्यातील सहकारी चळवळीतील ही निवडणूक केवळ पदाधिकारी निवडीपुरती मर्यादित न राहता भविष्यातील धोरणात्मक निर्णयांनाही दिशा देणारी ठरणार आहे.
यासंदर्भात उल्लेखनीय बाब म्हणजे – भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीला तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता व न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले होते की, विद्यमान संचालक मंडळ सहा महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून नवे संचालक मंडळ स्थापावे, आणि बँकेवर प्रशासक नेमण्याची गरज नाही.
सहकार क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या निवडणुकीकडे आता केवळ भंडारा जिल्ह्याचेच नाही, तर संपूर्ण राज्यातील सहकारी चळवळीचे लक्ष लागले आहे. ६ जूनला होणाऱ्या अंतिम मतदार यादीच्या घोषणेनंतर राजकीय आणि सहकारी रंगत अधिकच गडद होणार यात शंका नाही.
[ad_2]