[ad_1]
राज्यात सध्या महायुतीचे सरकार कार्यरत आहे. या महायुतीत भाजपसोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. मात्र, स्थानिक पातळीवर राजकीय गणित वेगळे असते, याचे ताजे उदाहरण नागपुरात पाहायला मिळाले
.
नागपूर जिल्ह्यातील मौदा खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने एकत्र येत संयुक्त पॅनल तयार केले. या पॅनलने निवडणुकीत बाजी मारली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचा पराभव केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी नेतृत्व केलेल्या पॅनलमधील सर्व उमेदवार अपयशी ठरले.
काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि भाजपचे माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले. या विजयानंतर काँग्रेसचे खासदार शामकुमार बर्वे, टेकचंद सावरकर आणि विजयी उमेदवारांनी फोटोसेशन करत आनंद व्यक्त केला.
बाबा गुजर यांची थेट अजित पवार यांच्याकडे तक्रार
पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी थेट अजित पवार यांच्याकडे तक्रार करत भाजप आणि काँग्रेसच्या भ्रष्ट युतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, सुरुवातीला आमचे टेकचंद सावरकर यांच्याशी बोलणे झाले होते आणि आमच्यात युती ठरली होती. फार्म भरण्यापर्यंत आम्ही एकत्र होतो. पण नंतर त्यांनी आम्हाला धोका दिला. त्यांनी भाजपवर आरोप केला की, त्यांनी महायुतीत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, टेकचंद सावरकर यांच्यावर भाजपने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची पुढील भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
[ad_2]