बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या 3 मुली झाल्या होत्या बेपत्ता:10 किमी पायी चालत गेल्या, पोलिसांनी तीन तासातच शोधल्या‎

0

[ad_1]


तालुक्यातील महागाव गडी येथील १०, ११ व १२ वर्ष वय असलेल्या तिन्ही मुली सोमवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी रानात गेल्या होत्या. बकऱ्या संध्याकाळी परत आल्या, मात्र मुली आल्या नव्हत्या. त्यांना शोधून शोधून थकलेल्या पालकांनी मंगळवारी सकाळी अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मुलींचा शोध सुरु केला व तीन तासातच त्यांना शोधले. मुली १० किमी पायी गेल्या होत्या. बकऱ्या चारणे हे जीवावर येत असल्याने आणि पालक त्यांना जबरदस्ती करत असल्याने वैतागलेल्या मुलींनी घर सोडण्याची खूणगाठ बांधली. सोमवारी नेहमीप्रमाणे त्यांना बकऱ्या घेऊन रानात पाठवले होते. त्यानंतर त्या तिघींनी रानात बकऱ्या सोडून दिल्या व दिसेल त्या रस्त्याने चालू लागल्या. त्या अंजनगाव सुर्जी रस्त्याने पुढे गेल्या. वाटेत रुईखेड, पणज येथे त्यांनी एका शेतात कामाला ठेवता का म्हणून विचारपूसही केली होती. कार्ला येथे रमेश अकोटकर यांच्या फार्म हाऊसमध्ये आदिवासी कुटुंबे कामाला आहेत. बोलीभाषा एकच असल्याने त्या कुटुंबाजवळ गेल्या होत्या. इकडे त्या सापडत नसल्याने पालक बैचेन झाले होते. मंगळवारी पोलिसांसोबत पालकही फिरत होते. अखेर एका पेट्रोल पंपावर पोलिस थांबले असता एका युवकाने मुली दिसल्याची माहिती दिल्यावरून पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शेत शिवारातील रमेश अकोटकर यांच्या शेतातून त्या तिन्ही मुलींना ताब्यात घेतले. ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ उमेशचंद्र सोळंके, वासुदेव ठोसर, पोकॉ. सागर नागे, गोपाल जाधव, सुनिल वैराळे, पंकज पांडव यांनी परिश्रम घेतले. पोलिस होते टेन्शनमध्ये ठाणेदार किशोर जुनघरे यांनी पोलिसांचे दोन पथक गठीत केले. एका पथकात ते स्वत: होते. मुलींकडे मोबाइल नसल्याने लोकेशनचा प्रश्नच नव्हता. मुलींना पळवून नेले की आणखी काही म्हणून पोलिस टेन्शनमध्ये होते नदी, धरण, विहिरी व तलावावर जावून पाहिले. रस्त्याने दिसेल त्याला मुलींचे फोटो दाखवून माहिती विचारत होते. रुईखेड फाट्यावर एका युवकाने मुली दिसल्या होत्या व काम आहे का विचारत होत्या असे सांगितले तेव्हा पोलिसांना धीर आला. त्याने दाखवलेल्या मार्गाने पोलिस आणखी पुढे पुढे गेले आणि एकाने मुली रस्त्याने दिसल्याचे सांगितले. पोलिस अकोटकर यांच्या फार्महाऊसवर जावून थांबले तेथे त्यांना मुली दिसून आल्या. दोन सख्ख्या बहिणी तिन्ही मुलींमध्ये दोघी सख्ख्या बहिणी आहेत. तर तिसरी मुलगी ही त्यांच्याच नात्यातील आहे. शाळेला सुटी असल्याने पालक त्यांना बकऱ्या चारण्यासाठी पाठवत होते. त्यामुळे वैतागलेल्या मुलींनी घर सोडले होते. त्यांना शोधण्यासाठी दोन पथके गठीत केली होती. – किशोर जुनघरे, ठाणेदार अकोट ग्रामीण

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here