राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेकरिता अर्ज दाखल करण्याचे अरुण खरात यांचे आवाहन

0

कोपरगाव प्रतिनिधी : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना 5000 रुपये मानधन देण्यात येते. या योजनेसाठी 1 ते 31 जुलै 2025 दरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

या योजनेसाठी लाभार्थ्याचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे आणि दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा 40 वर्षे करण्यात आली आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक आहे. विधवा, परितक्त्या, दिव्यांग व वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्यांची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून आहे, अशा कलाकारांनाच प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही नियमित पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा. तसेच, महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक असणे या पात्रतेच्या अटी आहेत. 

अर्जदाराने अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नी एकत्रित छायाचित्र (लागू असल्यास), बँक पासबुकची प्रत, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), शासनाचे इतर प्रमाणपत्रे (लागू असल्यास), नामांकित संस्था किंवा व्यक्तीकडून शिफारसपत्र (लागू असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व ज्येष्ठ साहित्यिक व गोंधळी, आराधी, भारुड, नाटक, तमाशा, लावणी इत्यादी कलाकारांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर 31 जुलैपूर्वी अर्ज दाखल करावा, असे आवाहन लोककला व लोक कलावंत अभ्यासक अरुण खरात यांनी केले असून ह्या योजनेची व लागणारे कागदपत्र, अर्ज कुठे करावा याची माहिती ग्रामीण भागातील गाव खेड्यातील साहित्यिक, कलाकारांपर्यंत पोहोचावी त्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here