राहुरीत लाखो रुपयांच्या बनावट नोटासह तिघेजण जेरबंद.

0

सोलापुर ते राहुरी बनावट नोटांचे धागेदोरे.


देवळाली प्रवरा  प्रतिनिधी,
                राहुरी पोलिस पथकाने काल मध्यरात्री शहर हद्दीत धडाकेबाज कारवाई केली. दोन लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना पोलिस पथकाने सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
          अहिल्यानगर येथून तीन इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलवर राहुरीकडे येत आहेत. अशी गुप्त खबर राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना काल दि. २८ जून रोजी रात्री ११ वाजे दरम्यान मिळाली. तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलिस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा लावला. काही वेळाने तेथे एम एच ४५ वाय ४८३३ क्रमांक च्या मोटरसायकलवर तिन इसम आले. तेव्हा पोलिस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडले. पथकाने त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या जवळ २ लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. ॲक्सीस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वाणी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली. त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केले.
        

हवालदार सुरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी पप्पु ऊर्फ प्रतीक भारत पवार, वय ३३ वर्ष, रा. अर्जुन नगर, ता. करमाळा, जि. सोलापुर, तसेच राजेंद्र कोंडीबा चौघुले, वय ४२ वर्षे, तात्या विश्वनाथ हजारे, वय ४० वर्षे, दोघे रा. पाटेगांव, ता. कर्जत जि. अहिल्यानगर या तिघांवर गुन्हा रजि. नं. ७२४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १७९, १८०, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपी २०० व ५०० च्या बनावट नोटा राहुरी शहरात कोणाला देण्यासाठी आले होते. त्यांनी नोटा कोठून आणल्यात, यामध्ये आणखी कोण कोण सामील आहेत. या बाबतचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे हे करीत आहे.
         सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सुरज गायकवाड,प्रमोद ढोकणे, नदिम शेख, सतिष कुऱ्हाडे, अंकुश भोसले, चालक शकुर सय्यद आदि पोलिस पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here