पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा देशात कायम -स्नेहलताताई कोल्हे

0

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील भाजपच्या अभूतपूर्व विजयाबद्दल कोपरगावात आनंदोत्सव

कोपरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जादुई करिश्मा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे उत्कृष्ट नियोजन आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी घेतलेले परिश्रम यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. भाजपच्या या ऐतिहासिक शानदार विजयामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जनतेने कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वावर पुन्हा एकदा पसंतीची मोहोर उमटवून देशाला मोदी व भाजपशिवाय‌ पर्याय नसल्याचे दाखवून दिले आहे, असे माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विचारांवर व विकासकामांवर विश्वास ठेवून भाजपला बहुमतांनी विजयी केल्याबद्दल कोल्हे यांनी मतदारांचे मन:पूर्वक आभार मानले असून, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी (३ डिसेंबर २०२३) जाहीर झाले. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाबद्दल आज सायंकाळी कोपरगाव येथे शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर फटाके वाजवून व लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले‌, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, महावीर दगडे, नरेंद्र डंबीर, गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र बागुल, दादासाहेब नाईकवाडे विजय चव्हाणके, जयप्रकाश आव्हाड, जयेश बडवे, खलिकभाई कुरेशी, फकिर मोहम्मद पैलवान, इलियासभाई खाटीक, रहीम शेख, सतीश नरोडे‌, शंकर बिऱ्हाडे, किरण सुपेकर, दत्ता कोळपकर, सलीम पठाण, रोहन दरपेल‌, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे‌, रवींद्र लचुरे, सोमनाथ ताकवले, सुजल चंदनशिव, प्रभुदास पाखरे, संजय खरोटे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधक म्हणत होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा संपला, या तीन राज्यांमध्ये भाजप पराभूत होईल; पण शेवटी जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या निवडणुकांमध्ये भाजपला साथ देऊन मोदी यांचे हात बळकट केले आहेत. मोदीजींची बदनामी करणाऱ्या विरोधकांना धडा शिकवला आहे. आता देशभर भाजप व मोदी यांची लाट पसरली असून, ‘घर घर मोदी’ व ‘मन मन मोदी’ असे वातावरण तयार झाले आहे. भाजप हा जगातील सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला एक मोठा राष्ट्रीय पक्ष असून, भाजपची ध्येय-धोरणे व कार्यप्रणालीवर देशातील जनतेचा ठाम विश्वास आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपच जिंकेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीजी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडतील आणि पुन्हा पंतप्रधान होतील, असा दृढविश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here