सोनेवाडीची वीज दररोज पाच तास वीज वितरण कंपनीकडून खंडित..

0

पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली; 7 फेब्रुवारी रोजी जावळे करणार आमरण उपोषण

सोनेवाडी (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील गावठाण परिसरातील वीजपुरवठा गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने पाच तास खंडित करण्याची मोहीमच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले असून यामुळे गेल्या तीन महिन्यापासून गावातील पाणीपुरवठा योजनेच्या विद्युत मोटारी ही बंद राहत असल्याने गावातील नागरिकांना पुरेशे पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नसल्याने नागरिक आक्रमक झाले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कोपरगाव तालुका पदाधिकारी धर्मा शिवराम जावळे यांनी 7 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

सोनेवाडी परिसरातील इतर गांवात गावठाणातील विद्युत पुरवठा सुरळीत असतो मात्र सोनेवाडीतच विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी नियमामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो.गावात घरगुती कनेक्शनची संख्या जास्त असून वीज बिल देखील नियमित पणे भरली जात असताना वीज वितरण कंपनी अन्याय का करते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.गावातील पाणीपुरवठा योजनेची विद्युत जोडणी देखील याच कनेक्शन वर असून दररोज पाच तास वीज पुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरल्या जात नाही त्यामुळे नागरिकांना पुरेशी पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत नाही.सरपंच शकुंतलाताई गुडघे, उपसरपंच संजय गुडघे , निरंजन गुडघे,ग्रामविकास अधिकारी भानुदास दाभाडे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी वितरण कंपनीच्या पोहेगाव सब स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी याबाबत वेळोवेळी संपर्क केला मात्र आज वीज पुरवठा सुरळीत करून देतो उद्या वीज पुरवठा सुरळीत करून देतो म्हणून त्यांनी गेल्या चार महिन्यापासून वेळ मारून नेली आहे.

वेळोवेळी मागणी करून देखील जर सोनेवाडीवर वीज वितरण कंपनी अन्याय करत असेल तर हा अन्याय कदापि सहन केला जाणार नसल्याचे जावळे यांनी सांगितले.येत्या दोन दिवसात वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेऊन चार ते पाच तास खंडित होणारा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा अन्यथा बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पोहेगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर मंडप टाकून आमरण उपोषण केले जाणार असल्याचे धर्मा जावळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here