देशभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवा  :- महेश  बनकर

0

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये ‘करीअर’ मार्गदर्शन संपन्न
कोपरगांवः ‘हार न मानता प्रयत्न केले तर भारत देशाची  सेवा आपण उत्तम प्रकारे करू शकतो. त्यासाठी कोणकोणती पदे असतात, कोणत्या पदांना काय शैक्षणिक  पात्रता लागते, याचे ज्ञान सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अधिक विस्तृत मिळते. या ज्ञानाचा फायदा घेवुन अधिक सजग राहुन भारताच्या संरक्षण दलात सहभागी होवुुन देशभक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा,’ असे प्रतिपादन संरक्षण दलात अनेक पदांवर कार्य केलेले व दक्षिण आशियाई देश  नेपाळचे नव्याने भारतीय दुतावास म्हणुन नियुक्त झालेले आणि संजीवनी पॉलीटेक्निक व इंजिनिअरींग कॉलेजचे माजी विद्यार्थी, तालुक्यातील ब्राम्हणगांव येथिल मुळचे रहिवासी असलेले महेश ज्ञानदेव बनकर यांनी केले.

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने इ.८ वी ते ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजीत केलेल्या करिअर मार्गदर्शन  कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक  म्हणुन बनकर बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी डीन-नॉनअकॅडमिक डी. एन. सांगळे, वसतिगृह अधिक्षक विजय भास्कर व वरिष्ठ शिक्षकबाळासाहेब सोमासे व्यासपीठावर उपस्थित होते.
          बनकर पुढे म्हणाले की माझ्या यशाचा पाया संजीवनी मधुन घडला याचा मला सार्थ अभिमान आहे. देशाची  सेवा करायची, हा निश्चय मी केला होता. डोक्यात एखादा विचार आला की मार्ग सापडतो, याचा मला खरा अनुभव आला. वर्तमानपत्रात संरक्षण दलात सिव्हिल इंजिनिअर पाहीजे अशा आशयाची जाहिरात मी वाचली आणि लागलीच मी अर्ज केला. सर्व चाचण्या यशस्वी करून मी प्रथम भारत-चीन सीमेवर बॉर्डर रोडस् आर्गनायझेशन मध्ये सिव्हिल इंजिनिअर झालो. त्यानंतर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातही काम केले. परंतु मला संरक्षण दलाचे अधिक आकर्षण होते. परीक्षा देत राहीलो आणि भारतीय लष्करात  असिस्टंट कमांडंट इंजिनिअरही झालो. पुन्हा परीक्षा देतच राहीलो आणि आता भारतीय प्रजासत्ताक दुतावास झालो. म्हणजे प्रयत्न केले तर यश  हमखास मिळते. यावेळी भारतीय लष्कराच्या  सेवेत जाण्यासाठी विविध पदांसाठी कोणत्या परीक्षा असतात, हे त्यांनी सांगीतले, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची  उत्तरे दिली.
          अध्यक्षिय भाषणात सुमित कोल्हे म्हणाले की बनकर यांच्या सारखे विद्यार्थी संजीवनी मधुन घडले, ही संजीवनीच्या सुविधांची पावती आहे. संजीवनीमधुन हजारो यशस्वी विद्यार्थी घडल्याने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांना खऱ्या  अर्थाने आदरांजली ठरत आहे. स्व. कोल्हे यांचा शैक्षणिक  वारसा संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक जोमाने चालु आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये  प्रचंड क्षमता असतात, हे बनकर यांनी सिध्द केले आहे. एन. बी. वाघ यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here