अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या

0

आ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना

प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु

 कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यात गुरुवार (दि.२०) रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेच आहे मात्र अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले असून वीज पडून जनावरेही मृत्युमुखी पडले आहे. मतदार संघातील सर्व गावातील झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिल्या आहेत.

                          मागील काही दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या परतीचा पाऊस जाण्याचे नाव घेत नसून गुरुवार (दि.२०) रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोपरगाव शहरात वीज पडून जनावरे देखील मृत्युमुखी पडले आहे. आ.आशुतोष काळे यांनी आपले नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी त्यांच्या समवेत होते. सर्व गावातील व कोपरगाव शहरातील झालेल्या नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचनेनुसार गुरुवार (दि.२०) रोजी सकाळपासूनच प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली.  

               परतीच्या पावसाने चालू वर्षी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, फळबागा, भाजीपाला व चारा पिकांचे देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. सप्टेंबर महिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असून ऑक्टोबर महिन्यात देखील पावसाची संततधार सुरु आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सर्वच पिके भुईसपाट होऊन अडचणीत असलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे अजूनच अडचणीत सापडला आहे.

अशा परिस्थितीत गुरुवार (दि.२०) रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने पुन्हा एकदा कोपरगाव तालुक्याला झोडपले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतीबरोबरच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून घरातील संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यापाऱ्यांच्या कांदाचाळीत पाणी शिरल्यामुळे साठविलेल्या कांद्याचे देखील नुकसान झाले आहे. कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर, बैलबाजार रोड, गोकुळनगरी, खंदकनाला, स्टेशनरोड, खडकी, जुनीगंगा देवी मंदिर, जनार्दन स्वामी आश्रम, टाकळी रोड, आदी परिसर तसेच ग्रामीण भागातील जेऊर पाटोदा, मढी बु., चांदेकसारे, कोकमठाण (माळवाडी), शहाजापूर, टाकळी, माहेगाव देशमुख, कुंभारी, खिर्डी गणेश (भास्कर वस्ती), कोळगाव थडी आदी गावात झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच आ.आशुतोष काळे आपल्या यंत्रणेला सतर्क करून नागरिकांना मदत केली. झालेल्या नुकसानीची जास्तीत जास्त भरपाई नुकसानग्रस्तांना मिळवून देऊ अशी ग्वाही देऊन नुकसानग्रस्तांना त्यांनी दिलासा दिला आहे.

फोटो ओळ – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना आ. आशुतोष काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here