कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात गुरुवार (दि.२०) रोजी मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच आ. आशुतोष काळे यांनी मदतीचा हात देतांना तातडीने आपल्या यंत्रणेमार्फत मदत पोहोचविली.
गुरुवार (दि.२०) रोजी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या परतीच्या पावसाने कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात देखील हाहाकार उडवून दिल्यामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसले. यामध्ये कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर, बैलबाजार रोड, गोकुळनगरी, खंदकनाला, स्टेशनरोड, खडकी, जुनीगंगा देवी मंदिर, जनार्दन स्वामी आश्रम, टाकळी रोड, आदी परिसर तसेच ग्रामीण भागातील जेऊर पाटोदा, चांदेकसारे, कोकमठाण (माळवाडी), शहाजापूर, टाकळी, माहेगाव देशमुख, खिर्डी गणेश (भास्कर वस्ती) आदी ठिकाणी नागरी वस्तीत मोठ्याप्रमाणावर पाणी शिरले होते.
पावसाच्या या पाण्यामुळे नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणीमध्ये मदत करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी तातडीने आपली यंत्रणा पाठवून नागरिकांना मदत केली. अनेक ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी चर खोदून साचलेल्या पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करून देत नागरिकांच्या भोजनाची देखील व्यवस्था आ.आशुतोष काळे यांनी केली. त्यामुळे नागरिकांना अडचणीच्या परिस्थितीत देखील दिलासा मिळाला.