कोपरगाव : संपूर्ण कोपरगाव तालुक्यात काल झालेल्या ढगफुटीने उभ्या पिकाबरोबरच शेतीचे मोठे नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव तालुका व परिसरात काल रात्री ढग फुटी सदृश्य अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून उभ्या पिका बरोबरच अनेक शेतकऱ्यांची बागायत व जिरायत जमीन वाहून गेली आहे. अति प्रचंड पावसामुळे शेतीतील सकस माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे निव्वळ या पिकाचेच नुकसान झाले असे नाही तर पुढील काही वर्षे ह्या जमिनी नापिकी होणार आहे. काल झालेल्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट जिरायती शेतीसाठी एकरी पन्नास हजार तर बागायती शेती साठी एक लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी.
तसेच पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतमजुरांना देखील कोणतेही काम उपलब्ध नाही त्यामुळे शेतमजुरांना देखील प्रति कुटुंब दहा हजार आर्थिक मदत करावी पुढील संपूर्ण वर्षीचे सर्व शासकीय कर माफ करावे शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक फि माफ करावी .
शासनाने पंचनामे करण्याची वाट न पाहता पीक विम्याची शंभर टक्के नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी अशी मागणी या पत्रकात केली आहे.