अमृतवाहिनी एमबीएला बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूटचा राष्ट्रीय पुरस्कार

0

संगमनेर  :  गुणवत्ता, शैक्षणिक सुविधा, नाविन्यपुर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांची प्लेसमेंट याबाबत राष्ट्रीय स्तरावरील एशिया टुडे रिसर्च अँड मीडिया या समूहाद्वारे दिला जाणारा व्यवस्थापन शास्त्रातील राष्ट्रीय पातळीवरील २०२२ चा बेस्ट इमर्जिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र हा पुरस्कार अमृतवाहिनी एमबीएला मुंबई येथे शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. 
           मुंबई येथील नरिमन पॉईंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये राज्यपाल  भगतसिंग कोशारी, केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री ना. रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर तसेच सिनेअभिनेत्री जयाप्रदा, कबीर बेदी आणि पार्श्वगायक उदित नारायण यांच्या हस्ते हा पुरस्कार अमृतवाहिनी एमबीएला प्रदान करण्यात आला. यावेळी एमबीएच्या वतीने संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयुताई देशमुख व संचालक डॉ. बी.एम लोंढे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.देशभरातील गुणवंत महाविद्यालयांचा एशिया टुडे रिसर्च अँड मीडिया या समूहाद्वारे सर्वे केला जातो. यातून संस्थेमध्ये असलेल्या अत्याधुनिक सुविधा, शैक्षणिक परिसर, गुणवत्ता, सातत्यपूर्ण निकाल, संशोधन आणि विद्यार्थ्यांची नोकरीला लागण्याची सरासरी यावरून हे पुरस्कार निवडले जातात.काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा राज्याचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहीनी संस्थेने सातत्याने गुणवत्ता व विविध उपक्रमांतून देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. १९९५ मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयातून २७ बॅच मधून विद्यार्थ्यांनी एमबीएची उच्च पदवी घेतली आहे. या महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी देशात व परदेशात मोठमोठ्या पदांवर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच अनेक विद्यार्थी हे शासकीय सेवेमध्ये आपले कर्तव्य बजावत आहेत. संस्थेच्या सातत्यपूर्ण गौरवास्पद कामगिरीमुळे देश पातळीवर हा सन्मान झाला आहे.याप्रसंगी बोलताना सौ.शरयुताई देशमुख म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चतम गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्था कटिबद्ध आहेत.या महाविद्यालयाचा राष्ट्रीय स्तरावरील विविध कंपन्यांशी समन्वय असून त्याचा उपयोग हा विद्यार्थ्यांना नोकरी मिळणे कामी होत आहे. या यशामध्ये सर्वांचा सहभाग असल्याचे त्या म्हणाल्या.
अमृतवाहिनी एमबीएला मिळालेल्या या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयुताई देशमुख, इंद्रजीत थोरात, सौ दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, बाजीराव पा.खेमनर, लक्ष्मणराव कुटे, आर.बी. सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,व्यवस्थापक प्रा. धुमाळ, अमृतवाहिनी एमबीएचे संचालक डॉ. बी.एम लोंढे यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here