अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, मान्सूनवर होऊ शकतो परिणाम

0

 पुणे : मान्सून सुरू होतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी 1 जूनला मान्सूनने अरबी समुद्रात प्रगती केली आहे. मालदीवसह दक्षिण भारत आणि पश्चिम श्रीलंकेलगत असलेल्या कोमोरीन भागात मान्सून दाखल झाला आहे.

येत्या एक-दोन दिवसांत मान्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यापूर्वी भारतीय हवामान विभागाने आपल्या अंदाजात मान्सून वेळेपेक्षा उशिरा दाखल होण्याची शक्यता वर्तविली होती. नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून साधारणतः 1 जूनपर्यंत भारतात दाखल होत असतो. पण यंदा मान्सून केरळमध्ये उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. पण आता अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. येत्या आठवडाभरात ही ते तयार होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमध्ये असं म्हटलंय की, “5 जूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल. दोन दिवसांत कमी दाबाचं क्षेत्र वाढत जाऊन 7 जून पर्यंत त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.”

खासगी हवामान संस्था स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. यावर अ‍ॅक्युवेदरचे शास्त्रज्ञ जेसन निकोलस म्हणाले की, 3 किंवा 4 जूनच्या आसपास अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.

मान्सूनचं भारतात आगमन होत असताना जर बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात काही हालचाली झाल्या तर त्याचा मान्सूनवर परिणाम होतो.

स्कायमेटचे शास्त्रज्ञ महेश पलावत सांगतात की, अरबी समुद्रातील वादळं आपल्या केंद्राकडे आर्द्रता खेचतात, परिणामी भारतातील अनेक भागात मान्सूनला विलंब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चक्रीवादळ तयार होऊन उत्तरेकडे सरकल्यास महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण जर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनार्‍यापासून दूर गेलं किंवा समुद्रातच विरलं तर मात्र राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here