संगमनेर : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने मुख्य मार्केट यार्डामध्ये कांदा मार्केट आठवड्यातुन सलग ५ दिवस सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हितावह ठरला असल्याचे गौरवोद्उगार जिल्हा उपनिबंधक तथा संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक गणेश पुरी यांनी काढले.
संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बाजार समितीच्या नविन शेतकरी निवासात बाजार समितीचे प्रशासक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, बाजार समितीचे माजी सभापती शंकरराव खेमनर, सचिव सतिशराव गुंजाळ यांच्यासह बाजार समितीचे सर्व माजी संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यावेळी म्हणाले की संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्पन्न वाढीत सातत्य राखले आहे. तसेच उत्पन्न वाढीच्या दृष्टीने वडगावपान येथील उपबाजार समिती जमीन सपाटीकरण तसेच वॉल कपांउडचे आणि गाळ्यांचे बांधकाम सुद्धा पुर्ण केलेले आहे. तिथे प्रत्येक शनिवारी जनावरांचा बाजार भरत आहे. तसेच घारगाव येथेही उपबाजार समितीसाठी जागा घेतलेली आहे. तिथेही लवकरात लवकर काम सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही उप बाजार समितीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बाजार समितीचे माजी.सभापती शंकरराव खेमनर म्हणाले की बाजार समितीने निमोण येथे पेट्रोल पंप टाकण्यासाठी जागा निश्चित केलेली आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असून संगमनेर येथील पेट्रोल पंपाचे कामही पुढील महिन्यात सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वार्षिक सभेचे अहवाल वाचन बाजार समितीचे सचिव सतिषराव गुंजाळ यांनी केले.यावेळी बाजार समितीच्या मार्केट यार्डात सर्वात जास्त शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच सर्वात जास्त शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे माजी संचालक गंगाधर जायभाये यांनी उपस्थितांचे आभार मानले.