“आत्मविश्वास आणि आत्मशक्तीतूनच सबलीकरण शक्य”-  चैतालीताई काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर – “आत्मविश्वास आणि आत्मशक्तीतूनच सबलीकरण शक्य आहे. मग ते स्त्रियांचे असो की पुरुषांचे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. त्यासाठी स्वावलंबन, सक्षमता आणि कल्पकता या त्रिसूत्रींचा अवलंब करावा. यातून प्राप्त परिस्थितीत उपयुक्त ठरतील अशा कल्पना राबवत स्वतःबरोबरच इतरांचा विकास साधणे म्हणजे खऱ्या अर्थाने सबलीकरण होय” असे प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीच्या चेअरमन सौ. चैतालीताई काळे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज च्या ‘महिला कल्याण आणि स्त्री सबलीकरण’ समिती उदघाटन समारंभ नुकताच सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. सानप होते. यावेळी बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, इतरांची तुलना करण्यापेक्षा स्वतःची प्रतिमा तयार करा. आपल्या नावीन्ययुक्त कल्पनांचा उपयोग इतरांच्या आणि स्वतःच्या विकासासाठी कसा करता येईल याचा विचार प्राधान्याने करा. कारण स्वतःबरोबर इतरांना शक्ती देऊन प्रगती साधणे म्हणजे सबलीकरण होय. हे स्त्री व पुरुष या दोघांनी समजून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या सबलीकरणाबाबत असलेल्या संकल्पना जाणून घेतल्या.

<p>या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून समुपदेशक आणि योग प्रशिक्षक वृंदा कोऱ्हाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, स्वतःवर प्रेम करणाराचं इतरांवरही प्रेम करू शकतो. त्यामुळे आपल्यामधील उणीवा शोधण्यापेक्षा आपल्यामधील चांगल्या गुणांना वाव कसा देता येईल याचा विचार करा. आपल्या कला, गुणांचा वापर वैयक्तिक जीवनाबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी करा. शारीरिक उंची वाढविण्यापेक्षा बौद्धिक उंची वाढवा. त्यासाठी भरपूर पुस्तक व माणसांचं वाचन करा. लोक काय म्हणतात, त्यापेक्षा ‘मला काय वाटतं’ याचा विचार करून विकास साधणे म्हणजे खऱ्या अर्थाने सबलीकरण होय. यासाठी स्वतःची कला, आशय, आत्मविश्वास,आत्मनिर्भरता व आरोग्याची सुदृढता या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

        अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. सानप म्हणाले की, ‘देश परदेशातील सक्षम आणि कर्तृत्ववान महिलांची उदाहरणे देत जागतिक पातळीवरही महिला मागे नसल्याचे सांगितले. थोरांचे विचारकण वेचण्यातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा खरा विकास होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. उज्वला भोर यांनी करून देतांना समितीमागील उद्देश व भूमिका विशद केली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, महाविद्यालयीन अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. सीमा चव्हाण यांनी केले.

फोटो ओळ – श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज च्या ‘महिला कल्याण आणि स्त्री सबलीकरण’ समिती उदघाटन समारंभ प्रसंगी बोलतांना सौ. चैतालीताई काळे समवेत मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here