आरोग्य धनसंपदा

0

कानात किडा जाणे

कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्यता असते. आतल्या मळामुळे, अरुंद जागेमुळे आणि बाहेरून बोटाने प्रयत्न केल्यामुळे बहुधा किडा मरून जातो. पण किडा जिवंत असेल तर फडफडत राहतो. कधीकधी तो निसटून निघून जातो. किडा सहज निघत नसेल तर तेलाचे किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचे थेंब टाकून निष्क्रिय करावा. नंतर हा किडा काढता येतो. पण तो ताबडतोब काढून टाकणे आवश्यक असते. साधा छोटा चिमटा वापरून किडयाचा भाग पकडून संपूर्ण किडा बाहेर काढता येईल. नंतर कान कोमट पाण्याने धुऊन टाकणे चांगले. हे न जमल्यास कानाच्या डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे.
कानात बी किंवा खडा जाणेलहान मुले कानात बी, खडा, पेन्सिल, इत्यादी घालतात. टोकदार किंवा खरखरीत पदार्थ घातला असेल तर कानातील पडद्याला इजा होण्याचा संभव असतो. लहान मुले नीट माहिती सांगू शकत नाहीत. काही वेळा मूल घाबरल्यामुळे नीट माहिती कळत नाही. असे असले तरी आत गेलेला पदार्थ बी आहे की इतर पदार्थ हे ठरवणे आवश्यक आहे. बी असल्यास कानात पाणी घालू नये. कारण पाण्याने बी हळूहळू फुगत जाते व ती कानातून काढणे अशक्य होते. याउलट न फुगणारा पदार्थ (खडा, पेन्सिल, इ.) असल्यास कानात थोडे पाणी टाकावे. यामुळे तो पदार्थ कानात मोकळा होतो यानंतर कान जमिनीकडे केल्यावर पदार्थ पडून जातो. न पडल्यास निदान थोडासा बाहेर येतो. यामुळे तो काढणे शक्य असते.
मूल शांत रहात नसल्यास पदार्थ काढण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. नाही तर नाहक इजा होईल.

वस्तू काढण्यासाठी उपायकानात, नाकात गेलेल्या अशा वस्तू काढण्यासाठी दोन-तीन प्रकारची खास उपकरणे असतात. या उपकरणांना पदार्थाच्या मागे ओढण्याइतका बाक किंवा वाकडेपणा असतो. एक उघडमीट करणारा लहान वाकडा चिमटा असतो.
अशी उपकरणे नसतील तर साध्या सेफ्टी पिनचा टोक नसलेला वाटोळा भाग वाकवून घ्या. टोकदार भाग हातात धरून याचा वापर करून आत गेलेल्या पदार्थाच्या मागे नेऊन हळूहळू बाहेर ओढा. याने बहुधा तो पदार्थ बाहेर येतो. मात्र इजा न करण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कानातील वस्तू काढण्याची आणखी एक निर्धोक घरगुती पध्दत म्हणजे नळीच्या साहायाने खेचून घेणे. यासाठी साधी रबरी नळी वापरावी. कानाच्या आत जाईल इतकी ती लहान तोंडाची असावी. नळीची एक बाजू आपल्या तोंडात धरून दुसरे टोक त्या वस्तूवर लावावे; पण दाबू नये. मुलाचे डोके कोणालातरी पक्के धरून ठेवायला सांगावे. आता आपल्या तोंडातून हवा ओढण्याची क्रिया करावी. यामुळे हवेची पोकळी निर्माण होऊन कानातील वस्तू नळीने बाहेर खेचता येईल. बी असेल तर ती गुळगुळीत असल्याने सहज निघू शकते. या कामासाठी सलाईन सेटच्या नळीचा तुकडा वापरावा. शक्यतो अशा कामासाठी तज्ज्ञाकडे पाठवणे बरे. पदार्थ निघाल्यानंतर कान तपासून आत इजा झाली की काय हे पाहावे.

नाकात वस्तू जाणे
कानापेक्षा नाकातले पदार्थ काढणे जास्त अवघड व धोक्याचे असते. हा पदार्थ बी असेल तर ती नाकातल्या पाण्याने हळूहळू फुगत जाते. शेंगदाणा, वाटाणा, हरबरा, चिंचोके,इत्यादी पदार्थ भिजल्यावर तुकडयातुकडयाने निघण्याची शक्यता असते. तसेच नाकात मागे खूप जागा असल्याने आणि शेंबूड असल्याने सहसा हा पदार्थ मागे घशात जातो. याचवेळी तो तोंडात येतो व मग थुंकता येतो.

पण अशा प्रसंगात तो पदार्थ श्वासनलिकेत जाण्याचा सदैव धोका असतो. श्वासनलिकेत असे पदार्थ जाणे अत्यंत धोकादायक व घातक ठरते. त्यामुळे श्वासनलिका किंवा एखादी उपनलिका (फांदी) बंद होण्याचा धोका असतो. मुख्य श्वासनलिका बंद झाल्यास श्वासोच्छवास थांबून मृत्यू संभवतो. पण उपनलिका बंद झाल्यास फक्त फुप्फुसाचा तेवढा भाग निकामी होतो. एकंदरीत नाकातला पदार्थ सहज दिसत असला तरच प्रयत्न करावा;अन्यथा कानाघ तज्ज्ञाकडे पाठवून द्यावे. (ब-याच वेळा हा पदार्थ भूल देऊन काढणे भाग पडते.) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here