आर.एस.एस., बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी डॉ . विश्वंभर चौधरी यांचे भाषण बंद पाडले

0

सिन्नर : (विलास पाटील)

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमालेतील निर्भय बनो विषयावरील व्याख्यानात आर.एस.एस., बजरंग दल, भाजपा, विश्व हिंदू परीषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत त्यांचे भाषण बंद पाडले. भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांनी डॉ. चौधरी यांच्यासमोरील माईक हिसकावून घेतला तर माजी शहराध्यक्ष सुनिल तथा बाळासाहेब हांडे यांनी डॉ. चौधरी यांच्या हातातील व्याख्यानाचे मुद्दे असलेले कागद फाडून टाकले. जय श्रीराम सह विविध घोषणा देत श्रोत्यांनाही सभागृहाबाहेर पडण्यास कार्यकर्त्यांनी भाग पाडले.

व्याख्यानमालेतील चौथे पुष्प डॉ. चौधरी यांनी गुंफण्यास सुरुवात केली. स्वांतत्र्य चळवळीत हिंदूचे नेतृत्व महात्मा गांधी करीत होते. तर मुस्लिमांचे नेतृत्व बॅ. जिना करीत होते. गोडसे यांना मुस्लिमांचाच द्वेष होता तर त्यांनी जिनांचा खून करायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी महात्मा गांधींचा खून केला. कारण हा म्हातारा पुढे आपल्याच हिंदूराष्ट्राच्या संकल्पनेला विरोध करेल हे त्यांना माहित होते. म्हणून त्यांनी त्यांचा खून केल्याचा आरोप चौधरी यांनी केला. पाकिस्तानला गांधीमूळे 55 कोटी दिल्याचा आरोप केला जातो. मात्र, त्यामागील सत्य कुणी सांगत नाही. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारताच्या तिजोरीत 300 कोटी रुपये होते. त्यातील 70 कोटी पाकिस्तानला द्यायचेे असा निर्णय फाळणीच्या वेळीच इग्रजांनी घेतला होता. त्यातील 20 कोटी पाकिस्तानला दिलेही होते. मात्र, नंतर नेहरु व सरदार पटेल यांचा 55 कोटी द्यायला विरोध होता. त्यावर आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर एखाद्या देशाशी केलेला हा पहिलाच करार आपण मोडला तर जगात त्यातून वेगळा संदेश जाईल. ते योग्य होणार नाही. त्यामूळे उरलेले 55 कोटी पाकिस्तानला देऊन टाका अशी गांधीची भूमिका होती असे स्पष्ट करत 55 कोटींच्या आधीही गांधीना मारण्याचा प्रयत्न झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

म. गांधी यांनी सरकारची धोरणे योग्य नसतील तर त्या विरुध्द लढण्यासाठी निर्भय होण्याचा नारा दिला होता. आताही देशभर विचार, अभिव्यक्ती, अहार स्वांतत्र्यावर बंदी यायला लागली असून घरात मांस सापडले म्हणून हत्या झालेला आखलाक असो की आत्महत्या करणारा रोहीत वेमुला असो ह्या घटना काय सांगतात? माध्यमांच स्वातंत्र्य संपले आहे. जे संपादक ऐकत नव्हते त्यांना चॅनल्सने काढून टाकले तर काही चॅनल्सचे मालकच बदलेलेले आपण पाहिले आहेत. कॉंग्रेसचे सरकार असतांना आम्ही त्यांच्या विरोधात चॅनल्सवर बोलायचो. मात्र, त्यांच्या प्रवक्त्यांनी कधी आम्हाला देशद्रोही ठरवले नाही की पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला नाही. आताच्या सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरवले जातय. नवा राष्ट्रवाद आता देशात आला आहे. ज्यांनी तिरंग्याचा कायमच द्वेष केला ते आता हर घर तिरंगा सारखे अभियान राबवायला लागले आहेत. अशा काळात निर्भय बनो चळवळ गरजेची ठरत आहे. यापूर्वी गावागावात राम रथ निघायचे. मात्र, यंदाच्या मिरवणूकीत पहिल्यांदा डी.जे. वाजतांना आपण पाहिला. सिन्नरलाही वाजला का डी.जे. असा प्रश्न विचारताच सभागृहातून हो… चा आवाज झाला आणि वेगवेगळ्या भागात बसलेल्या आर.एस.एस. सह 20-25 कार्यकर्त्यांनी व्यासपिठाकडे धाव घेतली. जयंत आव्हाड यांनी माईक हिसकावून घेतला. बाळासाहेब हांडेनी कागदपत्रे हिसकावून फाडली. समाधान गायकवाड हे तावा-तावाने ओरडत कार्यंकर्त्यांना भडकावण्याचे काम करत होते. व्यासपिठाजवळ गोंधळ घालत ह्या कार्यकर्त्यांनी जय श्रीराम सह विविध घोषणा देण्यास सुरुवात केली व भाषण बंद करण्याची मागणी केली. काही उत्साही कार्यकर्ते थेट चौधरी यांच्या अंगावर धाऊन गेले. मात्र, दत्ता वायचळे, ॲड. विलास पगार, हरीभाऊ तांबे, ॲड. अण्णासाहेब सोनवणे, दत्ता गोळेसर, डॉ. श्यामसुंदर झळके,  सागर गुजर, जितेंद्र जगताप, नामदेव कोतवाल यांच्यासह अनेक रसिक व वाचनालयाच्या संचालकांनी त्यांना रोखले. माझ्या व्याख्यानाने तुमच्या गावातील वातावरण दुषित होणार असेल तर मी व्याख्यान थांबवतो असे म्हणत चौधरी यांनी भाषण थांबवले. तरी भाजपा, संघाचे कार्यकर्ते थांबायला तयार नव्हते. तुम्हाला त्यांचे विचार पटत नसतील तर तुम्ही निघून जा. आम्हाला ऐकू द्या अशी मागणी काही रसिकांनी केली. मात्र, चौधरी सभागृहाबाहेर जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही बाहेर पडणार नाही असे म्हणत संघ भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ सुुरुच ठेवला. त्यानंतर पोलीसांनी सभागृहात येवून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांचे ते ऐकत नव्हते. वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, पुंजाभाऊ सांगळे, विलास पाटील, नरेंद्र वैद्य यांनी संघाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालत त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलीसांच्या संरक्षणात चौधरी यांना सभागृहातून बाहेर नेण्यात आले. त्यापूर्वी मराठा सेवा संघ, राष्ट्र सेवा दल, सिटू, महामित्र परिवार, अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आर.एस.एस., बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांचा निषेध करीत भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.

हुकूमशाही आली आहे का?

       डॉ. चौधरी सत्य तीच परिस्थिती मांडत होते. त्यांच्यावर हल्ला करणे भ्याडपणाचे लक्षण आहे. त्यांचे विचार पटत नसतील तर ऐकू नका. मात्र, त्यांना बोलूच द्यायचे नाही ही गुंडगिरी झाली. देशात हुकूमशाही आली आहे का? असे प्रकार यापुढे वाचनालयात खपवून घेतले जाणार नाहीत. संघ, भाजपा, बजरंग दलाच्या गुंडगिरीचा आम्ही निषेध करतो. : कृष्णाजी भगत* अध्यक्ष, सिन्नर सार्वजनिक वाचनालय*

       संघ, भाजपा, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मला बोलूच द्यायचे नाही असा निर्णय घेत घातलेला गोंधळ निषेधार्ह आहे. त्यांनी कितीही विरोध केला, गोंधळ घातला तरी सत्य जगासमोर मांडण्याचे मी थांबवणार नाही. त्यांच्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारही करणार नाही. : डॉ. विश्वंभर चौधरी*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here