संगमनेर : तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरात दहशत निर्माण करणारा आणि दुचाकीवरून जाणाऱ्या दुचाकीस्वरांना हल्ला करून जखमी करणारा हल्लेखोर बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तब्बल १४ दिवसांनी जेरबंद झाला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.
आश्वी खुर्द येथील शेतकरी दामोधर विश्वनाथ क्षिरसागर हे गावातून आपल्या वस्तीवर दुचाकीवरून जात असताना सोमवार दि. १० ऑक्टोबर रोजी सांयकाळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करुन जखमी केले होते. यामध्ये दामोधर क्षिरसागर हे थोडक्यात बचावले होते. मात्र बिबट्याने त्यांच्या पायाला पंजा मारल्यामुळे मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे हल्लेखोर बिबट्याच्या दहशतीने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यामुळे याठिकाणी वनविभागाने पिजंरा लावून त्यामध्ये भक्ष म्हणून कुत्र्याला ठेवले मात्र चाणाक्ष बिबट्या कुत्र्याचे भक्ष असताना सुद्धा या पिंजऱ्याजवळ गेला नाही. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी डोके चालवत कुत्र्याऐवजी भक्ष म्हणून कोंबडी ठेवली आणि या कोंबडीच्या लालसेने हल्लेखोर बिबट्या तब्बल १४ दिवसांनी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकला. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच मंगळवारी पहाटे वनविभागाचे वनपाल उपासनी, पी.आर गागरे, बी.सी चौधरी, हरिचंद्र जोझार, सुखदेव सुळे, महेश वाडेकर यांनी आश्वीत दाखल होत बिबट्याला ताब्यात घेतले. सदरचा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय दोन वर्ष असल्याची माहिती वनविभागाने दिली. सदरचा बिबट्या सध्या निंबाळे नर्सरीत सरकारी पाहुणचार घेत आहे.