नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी असलेले अमरावती जिल्ह्यातील खासदार बच्चू कडू यांनी काल नागपुरात (Nagpur) पत्रकार परिषद घेऊन बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांना आव्हान दिले आहे. केलेल्या आरोपांचे पुरावे १ नोव्हेंबरपर्यंत द्या, नाही दिले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. त्यानंतर राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच आज महाराष्ट्र कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कडू व राणा या दोघांचीही ईडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadanvis) समर्थक आहेत आणि त्यांनी आमदार बच्चू कडूंवर (MLA Bacchu Kadu) गुवाहाटीला गेले असताना पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. आमदार हे संविधानिक पद आहे. जर परमबीर सिंग यांच्या येवढा मोठा गदारोळ होऊ शकतो की, सीबीआय आणि ईडी चौकशी करू शकते. तर मग एका जबाबदार आमदाराने दुसऱ्या जबाबदार आमदारावर पैसे घेऊन सरकार पाडल्याचा आरोप केला आहे, त्याची ईडी चौकशी व्हायलाच हवी, असे अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले.
या प्रकरणात तर आयकर विभागानेही चौकशी करायला हवी. कुठून हवाला झाला? पैसे कुठून गेले? कुणी दिले? कुणी घेतले, कुणाच्या बॅक खात्यावर पैसे जमा झाले आहेत का, या सर्व प्रश्नांची उत्तरे ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करण्याची गरज आहे. एकदुसऱ्यावर जी चिखलफेक सुरू आहे, त्यामध्ये महाराष्ट्राची जनता भरडली जात आहे. महाराष्ट्राची बदनामी होत आहे. त्यामुळे आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयने चौकशी करावी. कारण आता सीबीआय महाराष्ट्रात येऊन चौकशी करू शकते, असे लोंढे यांनी सांगितले.
आता ही चौकशी झालीच पाहिजे. नाहीतर आपण पक्षपाती आहात, केवळ विरोधी पक्षावर सूड उगवण्यासाठी काही लोकांची ईडी, सीबीआय आणि आयटी चौकशी केली. असा त्याचा अर्थ निघेल, असे म्हणत लोंढेंनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे. सत्ताधारी पक्षात सहभागी असलेले अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांची चौकशी केली पाहिजे, अशी कॉंग्रेसची मागणी असल्याचे अतुल लोंढे यांनी सांगितले.