
संगमनेर : देवकौठे गावचे सुपुत्र व इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना प्रवेशा करीता सातत्याने मागील १५ वर्ष मोफत मार्गदर्शन करणारे इंजिनीयर दशरथ किसनराव आरोटे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे जुन्या पिढीतील कार्यकर्ते किसनराव आरोटे यांचे ते सुपुत्र होय. देवकौठे गावातील पहिले इंजिनियर असलेल्या आरोटे यांनी अमृतवाहिनी संस्थेत काही वर्षे सेवा केली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्टसाठी सातत्याने मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडे येत होते. याचबरोबर मागील पंधरा वर्षात दशरथ आरोटे व त्यांच्या पत्नी साधना आरोटे हे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेशाबाबत मोफत मार्गदर्शन करायचे. याचबरोबर आलेल्या सर्व पालक, विद्यार्थ्यांचे स्वागत करायचे. यामुळे संगमनेर तालुक्यात त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कार जाहीर झाले होते. देवकौठे गावच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीतही त्यांनी सातत्याने मोलाचे योगदान दिले. तसेच नवीन पिढीला मार्गदर्शन केले. शुक्रवारी दिवसभर गावातील गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नाशिक येथील महाविद्यालयांमध्ये त्यांनी भेटी दिल्या. आयुष्यभर इतरांसाठी झटणाऱ्या या व्यक्तिमत्वाने शेवटपर्यंत इंजिनिअरिंगची मेरिट लिस्ट बाबत काळजी घेतली.नाशिकहून प्रवास करून घरी आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.यावेळी प्रा. डॉ. रमेश पावसे, सुरेश मुंगसे, त्यांच्या सुविध पत्नी साधनाताई आरोटे, मुलगा प्रसाद व सुनबाई मंजिरी ह्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात माझेघर परिसर, संगमनेर तालुका, देवकवठे गाव व तळेगाव पंचक्रोशीत हळहळ निर्माण झाली. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी साधनाताई, मुलगा प्रसाद, सुनबाई ,भाऊ, बहिणी, नातवंडे ,पुतणे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अकस्मात निधनाने आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे ,भारत मुंगसे ,भागवतराव आरोटे, सुभाष सांगळे, एकनाथ मुंगसे, दत्तात्रय आरोटे, दिलीप पवार, दत्तू मुंगसे, नामदेव कहांडळ यांसह विविध मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.