उर्वरित पिक विमा धारकांना अग्रीम पिकविमा रक्कम तातडीने द्या : आ. आशुतोष काळें

0

कोळपेवाडी वार्ताहर :- – आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पिक विमा कंपनीला अग्रीम पिक विमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या असून कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा अग्रीम पिक विमा रक्कम मिळाली असून अनेक शेतकऱ्यांना हि रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे उर्वरित पिक विमा धारक शेतकऱ्यांना तातडीने अग्रीम पिक विमा रक्कम मिळावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजयजी मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगांव विधानसभा मतदार संघातील ४५,०६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा घेतला असून एकूण ६४,०२३ शेतकऱ्यांनी पिकविमा अर्ज दाखल केलेले होते. विमा कंपनीच्या निकषानुसार नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम मिळालेली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजयजी मुंडे, कृषी विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार व जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून पिक विमा कंपनीने प्राथमिक स्वरुपात सोयाबीन पिकाचे अग्रीम पिक विमा रक्कम वाटप केली असून यामध्ये सोयाबीन पिक विमा धारक काही शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा रक्कम मिळालेली नाही.

यामध्ये एकूण ६४,०२३ पिक विमा धारक शेतकऱ्यांपैकी सोयाबीन-१०,०००, मका -६,०००,बाजरी- ७४०, कांदा- ४३५, कपाशी-३,८८८ व तुर-२१५ अशा एकूण २१,२७८ शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही. मतदार संघातील कोपरगांव, सुरेगांव, दहेगांव, रवंदे, पोहेगांव व पुणतांबा मंडलामध्ये जवळपास दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान होवून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना पिक विम्याच्या माध्यमातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची पर्वा न करता उसनवार व कर्ज घेवून रब्बी हंगामातील पिके उभी केली असून रब्बी हंगामातील पिकांच्या पुढील खर्चाला पिक विमा रक्कमेचा हातभार लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करून कोपरगाव मतदार संघातील उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने अग्रीम पिक विमा रक्कम देणे बाबत पिक विमा कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजयजी मुंडे यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here