एकात्मिक कीड व्यवस्थापन काळाची गरज – ऋषिकेश मानकर

0

संगमनेर : रासायनिक किटकनाशकांच्या अशास्त्रीय वापरामुळे  मानवी आरोग्य व शेतीच्या जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तसेच उत्पादन खर्चातही खूप वाढ झालेली आहे. या द्रुष्टचक्रातून वेळीच बाहेर पडायचे असेल तर कीड व रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा मार्ग अंगीकारणे काळाची गरज झाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केन्द्राचे स.व.सं.अधिकारी ऋषिकेश मानकर यांनी केले. 

            केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र ,नाशिक यांच्या वतीने तालुक्यातील साकुर येथे खरीप हंगाम २०२२-२३ शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शेती शाळेच्या  कार्यक्रमाची सांगता करताना केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केन्द्राचे स.व.सं.अधिकारी ऋषिकेश मानकर बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की यांत्रिक ,जैविक व रासायनिक या सर्व पद्धतींचा एकत्रित वापर केल्यास कीड व रोगांचे प्रभावी नियंत्रण तर होतेच त्याच बरोबर फक्त रासायनिक कीटकनाशकांवर असणारे अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्चामध्ये बचत होते. त्याच बरोबर विषविरहित उत्पादन मिळू शकते असे त्यांनी यावेळी सांगितले.कपाशी पिक लागवडीसाठी लागणारे मार्गदर्शन व विविध प्रकारचे सापळे यांचे प्रात्यक्षिका सहित रोग व किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. फवारणी करताना वापरण्यात येणारी संरक्षण (आय पी एम) किट, गम बुट, इन्सेक्ट नेट यांचे प्रात्यक्षिक घेऊन ते वाटप करण्यात आले.

सदर शेतीशाळेला कृषी सहायक अशोक रंधे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीशाळेच्या कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here