उरण दि 26(विठ्ठल ममताबादे ) वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या, कपाळाला भस्म, गळ्यात इष्टलिंग धारण करून भगवान शिवाला आपले आराध्य दैवत मानणाऱ्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमे निमित्त भरत असलेल्या यात्रेमध्ये श्रीक्षेत्र कपीलधार ता. जि. बीड येथे भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजित केला जातो. त्यासाठी राज्यभरातून सुमारे 4 ते 5 लाख कार्यकर्ते व भाविक उपस्थित राहतात. शिवा संघटनेच्या मागणीनुसार श्रीक्षेत्र कपीलधार जिल्हा बीड येथे श्री क्षेत्र पंढरपुर प्रमाणेच सन 2002 पासुन शासनाच्या वतीने शासकीय महापूजा करण्यात येत आहे. दि. 19 नोव्हेंबर 2002 रोजी पहीली शासकीय महापूजा संपन झाल्यानंतर शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त प्रतिवर्षी शासकिय महापूजा संपन्न होत आहे. यंदा 21 वी शासकीय महापूजा आणि शिवा संघटनेचा 27 वा राज्य वार्षिक मेळावा मोठया उत्साहात संपन्न होणार आहे.
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातील लाखो लिंगायत भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे 16 व्या शतकातील वीरशैव संत श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांची संजिवन समाधी मंदिर आहे.प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार येथे सोमवार दि. 07 नोव्हे. 2022 रोजी दुपारी ठिक 4.00 वाजता 21 वे शासकीय महापूजा बीडचे पालकमंत्री ना. अतुल सावे, केंद्रियराज्यमंत्री ना. डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त अण्णा शिरसागर, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व अनेक शिवाचार्य यांच्या हस्ते संपन्न होणार असुन त्यानंतर या मान्यवरांच्या उपस्थितीत शिवा संघटनेचा 27 वा राज्यव्यापी वार्षिक मेळावा शिवातीर्थ मैदान, कपिलधार येथे संपन्न होणार आहे. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे सर्व राष्ट्रीय, राज्य पदाधिकारी कार्यकर्ते, सांप्रदायिक मंडळी व वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी जय शिवाचा नारा देत आपल्या वाहनावर शिवा संघटनेचे झेंडे व बॅनर लावून मोठ्या जल्लोषात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले आहे.