देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरीतही पक्षाचे बंधने तोडून कार्यकर्त्यानी पक्ष प्रवेशाचा पोरखेळ मांडला पक्ष प्रवेश करण्याच्या फंद्यात कार्यकर्त्यांनीही आघाडी घेतली आहे. भाजपमध्ये कार्यकर्त्यासह प्रवेश केलेल्या एका तरुणाने २४ तास उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात दाखल होऊन पुन्हा घड्याळ हाती बांधल्याचा सोनगाव-सात्रळ परिसरातील कार्यकर्त्यांबाबत घडला.
राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रावसाहेब चाचा तनपुरे व नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले धीरज पानसंबळे यांनी कन्हैया दिघे व त्यांच्या मित्रांना भाजपमध्ये दाखल करून घेतले. संबंधित तरुणांनी भाजपमध्ये मा. आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याचा फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झाला. काही भाजपच्या हौशी कार्यकर्त्यांनी तात्काळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचण्यास प्रारंभ केला.राष्ट्रवादीचे आमदार तनपुरे यांची सत्ता जाताच कार्यकर्तेही जिकडे सत्ता तिकडे भत्ता,त्यामुळे भाजपमध्ये दाखल होत असल्याचे बोलले जाऊ लागले.
भाजप प्रवेशाचा फोटो व्हायरल होत असतानाच दुसऱ्याच दिवशी आ. तनपुरे यांच्या उपस्थितीत संबंधित प्रवेशाचा तरूणाचा राष्ट्रवादीत फोटो व्हायरला झाला. भाजपात प्रवेश केलेल्यांपैकी कन्हैया दिघे, विजय शिंदे व पावलस पडघडमल यांनी अक्षय दिघे, आदिनाथ दिघे, संदिप शिंदे यांच्या पुढाकारातून हातात घड्याळ बांधत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर यावरूनही सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. २४ तासातच एका पक्षातून दुसऱ्या प्रवेशात केल्याचे दोन्ही फोटो सोलश मीडियामध्ये चांगलेच व्हायरल झालेले आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुका लक्षात घेता राहुरीत राष्ट्रवादीचे तनपुरे विरोधात भाजपचे विखे-कर्डिले युतीकडून पक्षप्रवेश
करून एकमेकांना शह देण्याचा होत असलेला प्रयत्न पाहता राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. तनपुरेंवर थेट आरोप न करणारे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आता आ. तनपुरे यांसह माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांना भाषणातून निशान्यावर घेत राजकीय घडामोडींना वेग दिला आहे.
चौकट
सुबह का भुला शाम को लौटा ;दिघे
मी पहिल्यापासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना मानतो. सुबह का भुला शाम को लौटा याप्रमाणे आम्ही भाजपमधून राष्ट्रवादीत आलो आहे. आ. प्राजक्त तनपुरे हे कोणताही गट, तट न पाहता केवळ विकासात्मक दृष्टीकोण असणारे नेतृत्व आहे. राष्ट्रवादी पक्षाला बळकटी देण्यासाठी आम्ही पक्षात आलो असल्याचे मत भाजपमधून २४ तासातच राष्ट्रवादीत आलेल्या कन्हैया दिघे या युवकाने व्यक्त केले.