संगमनेर : मित्रांबरोबर कालव्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची घटना संगमनेर तालुक्यातील मनोली येथे घडली. मयूर मिलिंद पराड (वय १६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गुरुवार दि.२० ऑक्टोबर रोजी दुपारी मयूर मिलिंद पराड हा सोळा वर्षे वयाचा तरुण आपल्या मित्रांबरोबर मनोली शिवारात असणाऱ्या खंडोबा मंदिराजवळील निळवंडे उजव्या कालव्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्यावर त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यावर आसपासचे लोक जमा झाले. मात्र उशीर झाल्याने मयूर पराड पाण्यात दिसेनासा झाला. त्यानंतर रहिमपूर येथील पट्टीचे पोहणारे नामदेव पिंपळे आणि दादाभाऊ पिंपळे यांना बोलवण्यात आल्यावर त्यांनी कालव्यात बुडालेल्या मयूरला पाण्याबाहेर काढले मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्यानंतर त्याला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयूर पराड हा त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो रहिमपूर येथील भिमाजी आंबुजी शिंदे, बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. याबाबत प्रमोद रेवजी शेळके यांनी खबर दिल्यावरून संगमनेर तालुका पोलिसांनी आकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर १२१/२०२२ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे दाखल केला असून अधिक तपास स.फौ एल.एम औटी करत आहेत.