देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
शेतीचे उत्पादन जास्तीत जास्त वाढवणं आणि देश अन्नधान्याच्या दृष्टीने स्वावलंबन करणं हि काळाची गरज आहे. त्या दृष्टीने सोनई कृषी महाविद्यालयाच्या या मुलींचं संशोधन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करणारं आणि सहकार्य करणारं ठरणार असल्याचे मत माजी महसूलमंत्री तथा अ.भा.क्रातिसेनेच्या संस्थापिका शालीनीताई पाटील यांनी व्यक्त केले.
कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व तिफन फाऊंडेशन संचलित सहाय्यक कृषि अधिकारी परिवार, तसेच राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन २०२२ राज्य स्तरीय खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धेत कृषी महाविद्यालय, सोनई या महाविद्यालयाच्या बी. एस. सी. ॲग्रीच्या अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या राहुरी तालुक्यातील वैष्णवी रावसाहेब अडसुरे, मिताली सुनिल भालेराव व त्यांच्या सहकारी कृषीकन्यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. या कामिगिरीबद्दल डॉ.पाटील यांनी एका व्हिडिओ लाइव्ह द्वारे संवाद साधत विद्यार्थिंनीचे अभिनंदन केले. यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना पाटील म्हणाल्या की, आपल्या देशाला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व संपन्न स्वयंम् स्वावलंबी होण्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि तशी कामगिरी करायची आहे. यादृष्टीने प्रत्येक नागरिकाने सक्षम बनलं पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले आहे. त्यादृष्टीने पेरणी झाल्यावर जशी काळजी घ्यायची, तशी पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे बियाणं असावं याची काळजी घेतली पाहिजे. त्या दृष्टीने या विद्यार्थ्यांनी चांगलं संशोधन केललं आहे. राज्यातून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हि खरोखरच अतिशय गौरवाची बाब आहे. कृषी बियाणे संदर्भात त्यांनी महत्वाचं निरिक्षण नोंदवत मोठं संशोधन केले. हे संशोधन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं व सहकार्य करणारं असल्याचे त्यांनी सांगितले.