कोपरगाव मतदार संघाच्या राहाता तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीची आ.आशुतोष काळेंनी केली पाहणी

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यात समाविष्ट असलेल्या अनेक गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून नुकसान ग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाचे राज्यभर थैमान सुरूच असून गुरुवार (दि.२०) रोजी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने दाणादाण उडवून देत संपूर्ण कोपरगाव मतदार संघाला झोडपून काढले. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे तर मोठे नुकसान झालेच तर त्याचबरोबर सर्वत्र पाणीच पाणी साचून हे पाणी नागरी वस्तीत शिरल्यामुळे सखल भागातील नागरिकांच्या घरातील घरातील संसारोपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले. शेत्तातील अनेक वस्त्यांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे नागरिकांना पाणी ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर राहिले नव्हते. मतदार संघातील नागरिकांचे ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी गुरुवार (दि.२०) रोजीच प्रशासनाला दिल्या होत्या. 

त्याबाबत झालेल्या नुकसानीचा आढावा घेवून प्रशासनाने काय कार्यवाही केली याची आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच राहात्याचे नायब तहसीलदार भाऊराव भांगरे, कामगार तलाठी वर्षा कावनपुरे, श्रीम. भारती लोखंडे, सोमनाथ शिंदे, ग्रामविकास अधिकारी तुळशीदास दिनकर, प्रमोद कानडे, सतीश दिघे, कृषी सहाय्यक किरण शिंदे, अजय डाके, संदीप गायकवाड आदी अधिकाऱ्यांच्या समवेत नपावाडी, शिंगवे, रस्तापूर आदी गावातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेवून प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती जाणून घेतली. गुरुवार (दि.२०) रोजी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने शासनाकडे पाठवा व लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मदत द्या काही अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या. 

फोटो ओळ – नपावाडी, शिंगवे, रस्तापूर आदी गावातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईबाबत प्रशासनाला सूचना करतांना आ. आशुतोष काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here