कोल्हे परिवार धावला कर्मवीरनगरवासीयांच्या मदतीला; कर्मवीरनगरमध्ये नगर परिषदेकडून पाणी उपसण्याचे काम सुरू

0

स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या सूचनेनंतर नगर परिषद प्रशासन लागले कामाला 

कोपरगाव : दि. २ नोव्हेंबर २०२२

            कोपरगाव शहरातील नव्याने हद्दवाढ झालेल्या कर्मवीरनगर, आदिनाथ सोसायटी परिसरात ड्रेनेजलाईनची व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. मागील पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील नागरिकांच्या घरात कंबरेएवढे पाणी साचून दुर्गंधी सुटली होती. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या सूचनेनुसार भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर नगर परिषद प्रशासनाने या भागात साचलेले पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

           शहरातील कर्मवीरनगर, आदिनाथ सोसायटी परिसरात ड्रेनेजलाईन नाही. गटारी नाहीत. रस्ते नाहीत. इतर मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या भागात भूमिगत गटारीचे काम झालेले नाही. त्यामुळे सांडपाणी व पावसाचे पाणी तुंबून राहते. दरवर्षी पावसाळ्यात या परिसरातील सर्व घरे पाण्याखाली जातात. 

          मोकळे प्लॉट आणि नागरिकांच्या घरात तसेच घरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केलेली नाही. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पाणी साचून दुर्गंधी पसरते. या साचलेल्या पाण्यामुळे डासांचा सुळसुळाट होऊन रेोगराई पसरते. 

           दरवर्षी भेडसावणाऱ्या या समस्येला नागरिक पुरते वैतागले आहेत. या भागातील रहिवाशांनी नगर परिषद प्रशासनाकडे आणि तालुक्याच्या लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही भूमिगत गटारी आणि इतर मूलभूत सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील अडीच महिन्यापासून या भागात पावसाचे पाणी साचलेले आहे.

          20 ऑक्टोबर रोजी  झालेल्या अतिवृष्टीचा कर्मवीरनगर, आदिनाथ सोसायटी परिसरातील नागरिकांना मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळे या भागातील नागरिकांच्या घरात आणि मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. नागरिकांच्या घरात तर कंबरेएवढे पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. नागरिकांना आपल्या घरात जाण्यासाठी दुसऱ्याच्या घराच्या टेरेसचा आधार घेण्याची वेळ आली.

              या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. या भागातील महिला आणि अन्य रहिवाशांनी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना भेटून ही समस्या मांडली होती. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनीही यासंबंधी पाठपुरावा केला, परंतु तरीही नगर परिषद प्रशासनाने गेली पंधरा दिवस कोणतीही उपाययोजना केली नाही. 

           अखेर नागरिकांनी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली.

           त्यानुसार स्नेहलताताई कोल्हे आणि विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान आणि भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांची भेट घेऊन कर्मवीरनगर भागात साचलेले पावसाचे पाणी त्वरित उपसण्याची तसेच भूमिगत गटारी बांधून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली. त्यावर मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी संबंधितांना ताबडतोब उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मंगळवारी (१ नोव्हेंबर) नगर परिषदेच्या यंत्रणेने या परिसरात साचलेले पावसाचे पाणी उपसण्याचे काम सुरू केले. 

            यावेळी पराग संधान, डी. आर. काले यांच्यासह प्रसाद आढाव, वैभव गिरमे, विजय चव्हाणके, अन्सारभाई शेख, निसारभाई शेख, आसिफभाई शेख, आकाश वाजे, रोहित कनगरे, शौकतभाई शेख तसेच या परिसरातील नागरिक उपस्थित होते. 

            कर्मवीरनगर, आदिनाथ सोसायटी परिसरात ड्रेनेजलाईनची सुविधा नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरात आणि घराच्या भोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. यंदाही पावसाळ्यात या भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांसमोर पुन्हा अडचणी निर्माण झाल्या. सर्व घरे पाण्याखाली गेल्यामुळे अडीच महिन्यांपासून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. नगर परिषद प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे नागरिकांनी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडे ही समस्या मांडल्यानंतर त्यांनी या प्रश्नात लक्ष घालून नगर परिषद प्रशासनाला या भागात ड्रेनेजलाईनची व्यवस्था करून ही समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना केली. 

         तसेच पराग संधान, डी. आर. काले यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या भागातील नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन ही समस्या सोडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाने या भागात साचलेले पावसाचे पाणी उपसण्याची मोहीम हाती घेतली आहे. 

           त्याबद्दल कर्मवीरनगर व परिसरातील नागरिकांनी स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, कर्मवीरनगर व परिसरात तातडीने ड्रेनेजलाईनची व्यवस्था करावी. त्याचबरोबर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here