कोळपेवाडीच्या पाकिटाचे ‘वेलकम’ करणाऱ्यांनी प्रथम आपली निष्ठा व पात्रता ओळखावी -सागर जाधव 

0

 

कोपरगाव : दि. १७ ऑक्टोंबर २०२२

          आपल्या राजकीय स्वार्थासाठी आणि पाकिटासाठी शिवसेना सोडून काळेंच्या कळपात सामील झालेल्या लोकांना शिवसैनिकांबद्दल बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नाही. शिवसेनेला धोका देणाऱ्या अशा लोकांचा खरा इतिहास जनतेला ठाऊक आहे. ज्यांची शिवसेनेपेक्षा काळेंशी जास्त निष्ठा आहे आणि जे लोक कोळपेवाडीहून येणाऱ्या पाकिटावर जगतात अशा उपटसुंभ लोकांची आमच्यासारख्या शिवसैनिकांवर टीका करण्याची लायकी नाही. कोळपेवाडीच्या पाकिटाचे ‘वेलकम’ करणाऱ्यांनी प्रथम आपली निष्ठा व पात्रता ओळखावी, असा पलटवार शिवसैनिक सागर जाधव यांनी माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांच्यावर केला आहे.

              ज्यांना शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल आदर नाही अशा काळे व त्यांच्या चेल्यांनी कोल्हे परिवार आणि शिवसैनिक यांच्याबद्दल कितीही गरळ ओकली तरी काळे यांनी शिवसेनेसोबत केलेली गद्दारी लपणार नाही, असा टोला सागर जाधव यांनी लगावला आहे.  कोळपेवाडीहून मिळणाऱ्या पाकिटाशी इमान राखण्यासाठी मेहमूद सय्यद हे शिवसैनिकांवर बिनबुडाची टीका करत आहेत. काळे यांनी मेहमूद सय्यद यांचे कशा प्रकारे ‘वेलकम’ केले हे आता जनतेसमोर आले आहे.   काही कारणामुळे मेहमूद सय्यद यांना आ. आशुतोष काळेंनी सांगितले तसेच बोलावे आणि ऐकावे लागते हे सर्वश्रुत आहे. ज्यांना स्वत:ला मराठी नीट बोलता येत नाही आणि लिहिताही येत नाही अशा अंगठाबहद्दर लोकांनी इतरांच्या बातम्या कुठून येतात यावर बोलणे म्हणजे निव्वळ हास्यास्पद आहे. 

              याच शिवसेनेच्या जीवावर मेहमूद सय्यद यांना अनेक पदे मिळाली. त्यांना वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती; परंतु तरीही शिवसेनेला धोका देऊन ते काळे गटात सामील झाले. त्यांनी आता आम्हाला निष्ठा शिकवू नये.  कोरोना काळात आपले चिरंजीव एका हॉटेलमध्ये काय उद्योग करत होते हे सर्व कोपरगावातील जनतेला माहीत आहे. राजकारण करत असताना आपल्या मुलाकडेही लक्ष द्या. आपल्या वार्डात काम करणाऱ्या ठेकेदारांना आपण का त्रास देत होता हे लपून राहिलेले नाही. अनेक पक्ष बदलणाऱ्यांनी शिवसैनिकांना निष्ठा शिकविण्याचे धाडस करू नये, असा खोचक सल्ला सागर जाधव यांनी सय्यद यांना दिला आहे.    

             शिवसेनेच्या जोरावर अशोकराव काळे हे दोनदा आमदार झाले; पण काळेंनी शिवसेना, ठाकरे कुटुंबीय आणि ‘मातोश्री’बद्दल अपशब्द वापरले असल्यामुळे कोणताही सच्चा शिवसैनिक काळे कुटुंबीयांची बाजू घेऊ शकत नाही.  आज त्याच काळे कुटुंबीयांची बाजू घेण्यासाठी मेहमूद सय्यद पुढाकार घेत असतील तर याहून मोठी दुसरी काय लाचारी असणार? मेहमूद सय्यद यांच्या नावाने माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या या कोळपेवाडीहून येतात. त्यावर मेहमूद सय्यद यांना कितीचे पाकीट मिळते ते त्यांनी जनतेला सांगावे, असे जाहीर आव्हानच सागर जाधव यांनी दिले आहे.

            २००४ आणि २००९ च्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अशोकराव काळे यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी मतदारसंघातील शिवसैनिकांनी जीवाचे रान केले होते. शिवसैनिकांच्या परिश्रमामुळेच काळे हे आमदार होऊ शकले; परंतु आमदारकी मिळाल्यानंतर अशोकराव काळे यांनी शिवसैनिकांचे उपकार विसरून त्यांच्यावरच अन्याय केला. आताही विद्यमान आमदार आशुतोष काळे हेदेखील शिवसैनिकांना त्रास देण्याचेच काम करत आहेत. ज्या शिवसेनेने अशोकराव काळे यांना आमदार केले त्या शिवसेनेशी एकनिष्ठ न राहता त्यांनी गद्दारी केली, शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावरून त्यांची निष्ठा दिसून येते. 

ज्यांचे वडील आणि ते स्वत:ही शिवसेनेशी एकनिष्ठ राहू शकले नाहीत त्या आ. आशुतोष काळे यांनी एकनिष्ठ शिवसैनिकांबद्द्ल आपल्याला सार्थ अभिमान आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे. ज्यांची शिवसेनेवर आणि ठाकरे परिवारावर निष्ठा नाही त्या आ. आशुतोष काळे यांना इतरांच्या निष्ठेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवसेनेशी ज्यांनी गद्दारी केली त्या काळेंच्या गोटात मेहमूदभाई तुम्ही सामील झालात आणि आज काळेंची बाजू घेऊन शिवसैनिकांवर तोंडसुख घेत आहात. हा प्रकार म्हणजे गद्दारांनी गद्दारांची साथ देण्यासारखे आहे.  शिवसेनेशी एकनिष्ठ न राहणाऱ्या लोकांचा वापर करून आ. काळे हे सत्यापासून पळण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्यासारख्या फितूर लोकांना कोळपेवाडीचे पाकीट मिळते म्हणून आ. आशुतोष काळे यांची बाजू घेऊन बोलावे लागते. तुमची ही लाचारी जनतेपासून लपून राहिलेली नाही, असेही सागर जाधव यांनी मेहमूद सय्यद यांना सुनावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here