क्लोरोहायड्रेट पावडर पासून बनविल्या जाणाऱ्या ताडीमुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात ; बनावट ताडी विक्रीतून हजारोंची कमाई  

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील

संगमनेर शहर व परिसरातील काही  ताडी विक्री दुकानातून खुलेआम बनावट ताड़ीची विक्री केली जात आहे‌. ही बनावट ताडी क्लोरोहायड्रेट पावडर पासून बनविली जात असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. ही बनावट ताडी पिल्यामुळे ताडी प्रेमींचे आरोग्य धोक्यात आले आहे. या ताडीच्या व्यवसायातून ताडी विक्री करणारे मालामाल झाले असून दररोज हजारो रुपयांचा नफा कमवत आहेत. यातून काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.                संगमनेर तालुक्यात ताडी विक्री व्यवसाय अनेक वर्षांपासून तेजीत सुरू आहे. पूर्वी ओरिजनल ताडी मिळायची. काहींच्या म्हणण्यानुसार शुद्ध ताडी शिंदोडीच्या झाडापासून तयार केली जाते. जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजुर  परिसरातील डोंगरामध्ये ही शिंदोडीची झाडे अस्तित्वात आहेत.या झाडांची ताडी संगमनेर तालुक्यात आणण्यात येते. ही ताडी एका माठात ठेवण्यात येते.२४  तासानंतर ती पिण्यायोग्य होते. त्यानंतर यामध्ये पाणी मिसळण्यात येते. ही ओरिजनल ताडी असते असे काहींचे म्हणणे आहे. मात्र संगमनेर शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ओरिजनल ताडीची विक्री केली जात नसल्याचे वास्तव आता समोर येऊ लागले आहे.        संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे शासनमान्य ताडीचे दुकान आहे. याशिवाय शहरातील नाटकी नाला परिसरात असेच एक दुकान अस्तित्वात आहे.  हे दुकानदार ओरिजनल शिंदोडीच्या झाडापासून बनवलेल्या ताडीची विक्री करण्याऐवजी बनावट ताडीची विक्री करून हजारो रुपयांचा बक्कळ नफा हे दुकानदार दररोज मिळवत आहेत.संगमनेर तालुक्याच्या सीमेवरील पुणे जिल्ह्यातील बेल्हे या गावातून ताडी मध्ये टाकण्यासाठी एक पावडर आणली जाते. क्लोरोहायड्रेट नावाची ही पावडर आहे. या पावडरमध्ये अन्य वस्तू टाकण्यात येतात. वीस पैशाच्या पावडर पासून वीस रुपयांची कमाई केली जाते. बनावट ताडी पिल्यामुळे अनेक ताडी प्रेमींचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. पाय दुखणे, मळमळ होणे असे विकार ताडी पिणाऱ्यांना होत आहेत. काही वर्षांपूर्वी अहमदनगर येथे बनावट ताडी पिल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. संगमनेर शहरातही वीस वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. असे असतानाही संगमनेर शहरात खुलेआम बनावट ताडीची विक्री केली जात आहे.बनावट ताडी पिल्यामुळे आरोग्याला मोठा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र शहरात सुरू असलेल्या या व्यवसायाकडे उत्पादन शुल्क तसेच भेसळ विभाग  व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अर्थपूर्ण तडजोडीमुळे या व्यवसायाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here