खरे नौटंकीबाज कोण हे जनतेला चांगलेच ठाऊक ; -माजी नगरसेविका विद्या सोनवणे यांचा सणसणीत टोला 

0

कोपरगाव : दि.  १५ ऑक्टोंबर २०२२

             पाणी, सिंचन, रस्ते, आरोग्य, शहरातील वाढीव घरपट्टीचा प्रश्न व इतर लहान-मोठे प्रश्न असो, जनहिताचे प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे परिवार कायमच सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या अत्यंत संकटाच्या काळात जनतेला वाऱ्यावर सोडून आ. आशुतोष काळे हे अम्पल-चम्पल खेळण्यात मग्न होते. गेली तीन वर्षे 

आ. काळे हे आपण काम करीत असल्याचा आभास निर्माण करून जनतेची दिशाभूल करत आहेत. खरे नौटंकीबाज कोण हे जनतेला चांगलेच माहीत आहे, असा सणसणीत टोला माजी नगरसेविका विद्या सोनवणे यांनी लगावला आहे. 

            राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिलेदार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विद्याताई सोनवणे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहर आणि तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबरच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मंत्री लोकनेते स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार आणि भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांनी आजपर्यंत काय-काय काम केलेले आहे, कोपरगाव तालुक्याच्या प्रगतीमध्ये कोल्हे परिवाराचे किती मोलाचे योगदान आहे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. याउलट आ. आशुतोष काळे आणि त्यांच्या परिवाराने तालुक्याच्या विकासात सतत खोडा घालण्याचाच प्रयत्न केलेला आहे. सदैव जनतेसाठी कार्य करणाऱ्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठविण्याचा धडाका लावला आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात कोल्हे यांना यश मिळत असल्यामुळे आ. आशुतोष काळे व त्यांचे समर्थक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून, त्यामुळे नैराश्यातून ते कोल्हे यांच्यावर खोटे आरोप व बिनबुडाची टीका करत आहेत. कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या घरपट्टी व मालमत्ता करवाढीच्या विरोधात भाजप, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच साखळी उपोषण केले. या साखळी उपोषणाला नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला.

स्नेहलता कोल्हे यांनी अवास्तव वाढीव घरपट्टी मान्य नाही, ती त्वरित रद्द झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेत शासन व प्रशासनाला या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे प्रशासनाने या उपोषणाची दखल घेऊन वाढीव घरपट्टीला स्थगिती दिली आहे. कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगावातील २७ हजार मालमत्ताधारकांची वाढीव घरपट्टीच्या जाचातून मुक्तता झाली. मात्र, याउलट आ. आशुतोष काळे यांनी स्वत:च्या खासगी कार्यालयात नगर परिषद अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ४० टक्क्यांपर्यंत घरपट्टी वाढविण्यास मान्यता देऊन नागरिकांना आर्थिक संकटात टाकले होते. हे जनतेपासून लपून राहिलेले नाही. 

              कोपरगाव शहरातून गेलेल्या नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडून दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विविध पक्ष, सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनी आंदोलन केले. 

स्नेहलता कोल्हे यांनीही या प्रश्नात लक्ष घातले. नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम धिम्या गतीने का सुरू आहे? केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सावळी विहीर फाटा ते येवला नाका, कोपरगाव या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देऊनही या संपूर्ण रस्त्याचे कॉँक्रिटिकरणाचे काम का सुरू होत नाही? याकडे लक्ष वेधण्यासाठी स्नेहलताताई कोल्हे आणि भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी (१३ ऑक्टोबर) नगर-मनमाड महामार्गावर भरपावसात खड्ड्यात बसून आंदोलन केले. वास्तविक आ. आशुतोष काळे हे लोकप्रतिनिधी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या खराब रस्त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याची त्यांची जबाबदारी असताना आणि राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता असतानादेखील त्यांनी या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले. नगर-मनमाड महामार्गाच्या आणि त्याअंतर्गत सावळी विहीर ते पुणतांबा फाटा ते येवला नाका या रस्त्याचे दुरुस्तीचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी आंदोलन करणाऱ्या स्नेहलताताई कोल्हे यांना ‘तुमची वेळ चुकली’, असे तुम्ही म्हणता; पण त्यात काहीच तथ्य नाही. मागील तीन वर्षे राज्यात तुमच्या पक्षाची सत्ता असतानाही तुम्ही नगर-मनमाड महामार्गाचे काम तर सोडाच, त्यावरील साधे खड्डे बुजविण्याचे कामसुद्धा करू शकला नाही. तसेच तालुक्यातील रस्त्यांचे प्रश्नही तुम्ही सोडवू शकला नाही. तुमच्या खोटारडेपणाला जनता पुरती कंटाळली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आशुतोष काळे यांना मतदान करून आपण चुकलो तर नाही ना, अशी भावना कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. अशोकराव काळे आमदार असताना कोपरगाव शहरातील व तालुक्यातील जनतेला पुणतांबा-श्रीरामपूर-देवळाली प्रवरा-राहुरीमार्गे अहमदनगरला जावे लागायचे. याचा तुम्हाला विसर पडला आहे का? त्याच काळात नगर-मनमाड महामार्गाची अवस्था आजच्यापेक्षाही वाईट होती. स्नेहलताताई कोल्हे आमदार झाल्यानंतर त्यांनी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सावळी विहीर ते कोपरगाव रस्ता चांगला करून घेतला होता. गोदावरी नदीवरील नवीन मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू करून घेतली. आताही या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत स्नेहलताताई कोल्हे पाठपुरावा करणार आहेत. खड्ड्यांचा इतिहास तुमचा आहे, कोल्हे यांचा नाही, हे तुम्ही विसरू नये, असेही सोनवणे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here