उरण दि. 8 (विठ्ठल ममताबादे)श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिर्डीच्या साईबाबांनी अवघ्या देशाला, समस्त मानवजातीला दिला. त्याच संदेशाची आठवण करून देत उरण तालुक्यातील खोपटे गावातील सुधीर दामाजी ठाकूर यांनी आपल्या घरात गणेशोत्सवा निमित्त श्री साई बाबांची प्रतिकृती (प्रतिशिर्डी) साकारली आहे. खोपटे येथील रहिवाशी सुधीर दामाजी ठाकूर हे गेली 9 वर्षे गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी नवनविन सजावट करण्यावर त्यांचा भर असतो.यावर्षी त्यांच्या राहत्या घरी बुधवार दिनांक 5/10/2022 रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गणपती विराजमान झाला असून या गणेशोत्सवाचे, गणपती मूर्तीचे विसर्जन 11/10/2022 रोजी करण्यात येणार आहे. सदर सजावट खोपटे गावातील रहिवाशी अजित अनिल ठाकूर यांनी केली आहे. तसेच सदर सजावट साठी मनोज ठाकूर, सुधीर ठाकूर,अर्चना ठाकूर,रुक्मीणी ठाकूर आदी ठाकूर कुटुंबियांनी विशेष मेहनत घेतली आहे. सदर सजावट ही शिर्डीची असून यात गणेश देवता साईबाबांच्या रुपात दाखविण्यात आले आहे. सुंदर व आकर्षक अशी सजावट असून खोपटे गावातील ग्रामस्थ , उरणच्या साईबाबांच्या मानाच्या पालखीच्या साईभक्तांनी या सजावटीचे कौतूक केले. आम्ही घरातील सर्व साईभक्त असल्याने यंदाचा देखावा शिर्डीचा केल्याचे सुधीर ठाकूर यांनी सांगितले.आम्हाला गणेश भक्तांचा, भाविक भक्तांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी गणेश मूर्तीचे दर्शन घेतले असल्याचेही सुधीर ठाकूर यांनी यावेळी सांगितले.