
संगमनेर : तालुक्यातील खंदळमाळवाडी नजीक असणाऱ्या येठेवाडी येथील चार चिमुरड्यां भावंडांच्या मृत्यूप्रकरणी घारगाव पोलिसांनी महावितरणच्या एका कर्मचाऱ्यासह येठेवाडी येथील दोन शेतकऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून महावितरणच्या कर्मचाऱ्याला गजाआड केले आहे. तर गुन्हा दाखल झालेले दोन शेतकरी परागंदा झाले आहेत.
शनिवार दि.८ ऑक्टोबर रोजी दुपारी तालुक्याच्या पठार भागातील खंदळमाळवाडी गावांतर्गत असणाऱ्या येठेवाडी परिसरातील वांदरकडा येथे वीज वाहक तारेचा जोरदार धक्का बसून दर्शन अजित बर्डे (वय ८), विराज अजित बर्डे (वय ६ ), अनिकेत अरुण बर्डे (वय १२) आणि ओंकार अरुण बर्डे (वय १०) या चार चिमूरड्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतात दोन सख्ख्या भावांच्या चार मुलांचा समावेश असल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनेनंतर रुग्णालयाने चारही मुलांचे मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले होते. मात्र या घटनेला दोषी असणाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत असा पवित्रा मृत मुलांच्या आई-वडिलांनी व संतप्त ग्रामस्थांनी घेतला होता. त्यामुळे घटनेची गंभीरता लक्षात घेता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी येठेवाडी येथे जात बर्डे कुटुंबियांचे सांत्वन करून दोषीवर कारवाईचे आश्वासन दिल्यावर या चार चिमूरड्यांवर रविवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी यावेळी मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी अकरा लाखाची मदत जाहीर केली. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी या घटनेला दोषी असणाऱ्या वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. येठेवाडी परिसरात अनेक दिवसापासून विजेची तार तुटून तळ्याजवळ पडली होती. याबाबत अरुण बर्डे यांनी घारगाव वीज उपकेंद्रात जाऊन माहिती दिली होती. मात्र वायरमन विजय भालेराव यांनी ती तार दुरुस्त न करता तशीच तळ्यावर पडून दिली. तसेच तार तुटलेली असताना तिच्यातून विद्युत पुरवठा सुरू केला तर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो हे माहीत असताना देखील गावातील जालिंदर लेंडे आणि साहेबराव लेंडे या दोघांनी विजेच्या रोहित्राचा चालू-बंद करण्याचा खटका चालू केल्याने चार निष्पाप मुलांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. याप्रकरणी अरुण हौशीराम बर्डे आणि अजित बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी महावितरणच्या एका वायरमन सह दोन शेतकऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून वायरमन भालेराव याला गजाआड केले आहे. तर दोन शेतकरी परागंदा झाले आहेत. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करत आहेत.