चालण्यासाठी वहिवाटीचा रस्ता तयार करण्याचे पिरकोन ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी

0

उरण दि 12 (विठ्ठल ममताबादे ): पिरकोन ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पिरकोन सर्व्हे नंबर 55/3 ही सरकारी गोवंड या नावाने परिसर सुपरिचित आहे. मात्र या परिसरात पक्का रस्ताच बनत नसल्याने तसेच अतिक्रमण हटत नसल्याने गावचा विकास रखडला आहे. वर्षानुवर्षे या समस्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने शेवटी गावातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

उरण तालुक्यातील पिरकोन ग्रामपंचायत हद्दीत मौजे पिरकोन सर्व्हे नं 55/3 ही मिळकत सरकारी गोवंड या नावाने 7/12 सदरी नोंद आहे. सदरचे मिळकतीतून मौजे पिरकोन तलाव ते मौजे पाणदिवे गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रोडने सर्व गावकरी, ग्रामस्थ आपल्या शेतीकडे जाण्यासाठी शेतीचे मशागत, करण्यासाठी लागणारे सामान नेण्याकरीता या रोडचा वापर करत असतात. सध्या या गोवंड मध्ये काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शेतीकडे जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय सदर रस्त्यात पावसामुळे चिखल झाल्याने रस्त्यात अनेक खड्डे पडले आहे . गावातील लोकांना शेतकऱ्यांना नांगर , बैलगाड़ी नेता येत नाही. शेतीला लागणारे खत औषध नेता येत नाही म्हणून पिरकोन गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत दिनांक 12/07/2021 रोजी उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांना पत्रव्यवहार करून सदरची समस्या सोडविण्याची मागणी देखील केली होती. असाच पत्रव्यवहार पिरकोनचे सरपंच रमाकांत जोशी यांच्याकडेही करण्यात आला होता. मे 2021 मध्ये ग्रामस्थांच्या मागणीचा व समस्यांचा विचार करून तहसिलदार यांनी सदर घटना स्थळी येऊन पाहणी केली होती.

अतिक्रमण हटवून रोड मोकळा करून घ्या असे तोंडी आदेश तहसिलदारांनी तलाठी यांना  दिले होते परंतु आजतागायत या रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे तसेच आहे. दि 30/01/2021 च्या पत्राअन्वये ग्रुप ग्रामपंचायत पिरकोनचे सरपंच रमाकांत जोशी यांनी ग्रामस्थांना पत्र लिहून माहिती दिली की सदरील अतिक्रमण हटविण्याबाबत मी तहसिलदार, गटविकास अधिकारी, तलाठी यांच्याशी पत्रव्यवहार देखील केले आहे. मात्र सर्व शासकीय स्तरावर कायदेशीर लोकशाही मार्गाने पत्रव्यवहार करून सुद्धा सदर रस्ता अतिक्रमण मुक्त होत नसल्याने पिरकोन मधील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर रस्ता अतिक्रमण मुक्त  व्हावा व सदर रस्ता हा कच्चा असल्याने पावसाळ्यात चिखल होऊन खराब होत असल्याने सदर रस्ता पक्का बनवावा असे दोन प्रमुख मागच्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.

गेली 10 वर्षे गोवंड (वेताळ देव) तलावाच्या उत्तर दिशेकडे पाणदिवे गावाकडील मागील बाजूस असा एक पारंपारिक रस्ता आहे. जेथून पूर्वी लोक पाणदिवे मार्गे कोप्रोली तेथून चिरनेरच्या दिशेने डोंगर भागात काही गुराखी गुरे चरविण्यासाठी डोंगर भागात नेत होते व जुन्या लोकांची पायवाट असा विस्तीर्ण कच्चा रस्ता आहे. आज गेली अनेक वर्षे त्या रस्त्यालगत अनेक घरे बांधली गेली आहेत. सदर या रस्त्या लगतील घरे बांधलेल्या कुटूंबातील अनेकांनी गेली 10 वर्षे आपल्याला पक्का रस्ता व्हावा म्हणून ग्रामपंचायत ते तहसिलदार, गावातील जाणकार, प्रतिष्ठीत व्यक्ती व अनेक -पक्ष नेत्यांना विनवणी केली, अर्ज दाखल केले. परंतु आजमितीला या कुटुंबातील लोकांच्या समस्येवर आजही एकानेही ठोस पाउले उचलली नाहीत. ऐन पावसाळ्यात या मातीच्या व चिखलाने भरलेल्या, रस्त्यातून वाट काढत ही कूटूंबे आजही या यातना भोगत आहेत. जणूकाही या रस्त्याला कोणीच वाली उरलेला नाही अशी येथील रहिवाशांची भावना आहे. सदर समस्या दिवसेंदिवस उग्र होताना दिसून येत आहे. गाव तिथे मुख्य रस्ता व घर तेथे किमान सामान्य रस्ता तरी या रहिवाशांना सुविधा मिळाल्या पाहिजे अशी माफक अपेक्षा ग्रामस्थांचे आहे.

(चौकट ):-

अनेक वर्षे झाले सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटत नाही तसेच कच्चा रस्ता पक्का देखील झाला नाही. या समस्याकडे कोणीच लक्ष देत नाही याचा त्रास सर्वांनाच आहे. सदर समस्या प्रशासनाने त्वरित सोडवावी अशी आम्हा सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.

– सूजीत पाटील, ग्रामस्थ पिरकोन

सदर रस्त्यासाठी शासनाचा 14 वा वित्त आयोगा अंतर्गत 3 लाखाचा निधी ग्रामपंचायत पिरकोनला मिळाला. या निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन सुध्दा झाले काम सुरू करताच मात्र रस्त्यावर ज्यांनी अतिक्रमण केले त्यांच्यामूळे हा रस्ता बनू शकला नाही. नंतर शेतकऱ्यांचा अर्ज ग्रामपंचायतीकडे आला. त्या वेळेस मी तहसिलदार तसेच सर्कल ऑफिसर यांच्याकडे पत्रव्यवहार करून हि समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. सदरचा रस्ता (गोवंड) ही सातबारा मध्ये असल्या कारणाने सदरचे अतिक्रमण हे तहसिलदार साहेबांच्या आदेशानुसार हटविण्यात येते. ही समस्या सुटावी यासाठी मी जवळ जवळ 3 वर्षे पत्रव्यवहार केला. पाठपुरावा केला. अनेकदा तहसील कार्यालयात गेलो. तहसीलदारांना भेटलो. त्यांनी सदर जागेची पाहणी सुद्धा केली. परंतु अद्यापही अतिक्रमण हटविण्यात आले नाही.

– रमाकांत जोशी, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पिरकोन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here