उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील ऐतिहासिक प्रसिध्द चिरनेर गावांमधील शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ मागील ३२ वर्षांपासून नवरात्रौत्सव साजरा करत आहे.यंदाचे ३३ वे उत्सव वर्ष असून या मंडळानी आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाईचा सुरेख देखावा साकारला आहे.सध्या हा देखावा भाविकांचे श्रध्दास्थान बनला आहे.
उरण तालुक्यातील चिरनेर या ऐतिहासिक प्रसिध्द गावातील तरुणांनी एकत्र येऊन ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्र यावे व आपल्या विचारांची देवाणघेवाण करावी तसेच विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम राबविण्यात यावे यासाठी १९९० साली शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ चिरनेर - रांजणपाडा मंडळाची स्थापना केली. चिरनेर गावातील श्री महागणपती देवस्थान हे जसे भाविकांचे श्रध्दास्थान आहे, त्याप्रमाणे या नवरात्रौत्सव मधिल दुर्गादेवीची ख्याती नवसाला पावणारी आदिमाया आदिशक्ती असून देवीच्या दर्शनासाठी ग्रामीण भागातील भक्तगण मोठ्या संख्येने आप आपल्या कुटुंबासह हजेरी लावतात. मागील वर्षांत कार्ल्या चे एकविरा देवी मंदिर, वणी चे सप्तशृंगी मंदिर यांचे हेबेहूब देखावे या मंडळाने साकारले आहेत.
चिरनेर गावात मोठ्या भक्तिभावाने, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात येत असलेल्या नवरात्रौत्सवा निमित्ताने दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमांसह महिलांचे पारंपारिक नृत्य, लहान मुलांसाठी फनीगेम्स, महिलांसाठी विशेष होम मिनिस्टर कार्यक्रम तर पारंपारिक बाल्या नाच आणि भव्य दांडिया हे कार्यक्रमाचे आकर्षण राहिले आहे. देवीच्या दर्शनासाठी उरण तालुका व परिसरातील भाविक तसेच अनेक मान्यवर दरवर्षी येत असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक संतोष ठाकूर यांनी दिली.