औरंगाबाद : चोरट्यांनी आपल्या दारूची आयुष्यभराची व्यवस्था करून ठेवली आहे. जाधववाडीतील सनी सेंटरमधील देशी दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल १ लाख ९८ हजार रुपयांची देशी दारू चोरून नेली. चोरी केल्यानंतर पकडले जाऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याचा डीव्हीआरही चोरून नेला. एकूण २ लाख ८ हजार ६०० रुपयांची ही चोरी काल, २७ सप्टेंबरला सकाळी समोर आली. दुकानमालक रवी जैस्वाल (रा. एन ४ सिडको) यांनी या प्रकरणात सिडको
पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २६ सप्टेंबरला रात्री १० ला दुकान बंद करून ते घरी गेले होते. सकाळी आठला दुकानातील नोकर आकाश जैस्वाल दुकान उघडण्यासाठी आला असता दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. त्याने लगेचच रवी जैस्वाल यांना कॉल केला. रवी जैस्वाल यांनी दुकानाकडे धाव घेऊन दुकान उघडले व पाहणी केली. पोलिसांनाही कळवल्याने तेही घटनास्थळी आले. देशी दारूचे बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले. देशी दारूच्या १८० मिलीच्या बाटल्या ठेवलेले ३४ बॉक्स गायब होते. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास केला जात आहे. तपास महिला पोलीस अंमलदार शिंगणे करत आहेत.
सिडको एन ६ मध्ये मेडिकल दुकान फोडले…
सिडको एन ६ मधील चिश्तिया चौकातील मीना मेडिकल स्टोअरवरही चोरट्यांनी डल्ला मारला. दुकानातून रोख २८ हजार २२० रुपये, २ हजार रुपयांचा मोबाइल, १५ हजार रुपयांची घड्याळ असा एकूण ४५ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना काल, २७ सप्टेंबरला सकाळी १० ला समोर आली. दुकानमालक अक्षय शिवाजीराव पाटील (रा. सनी सेंटर पिसादेवी रोड) यांनी या प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ते आणि त्यांचा मावसभाऊ महेश गरड दोघे मेडिकल सांभाळतात. मध्यरात्री एकला त्यांनी दुकान बंद केले. अक्षय पाटील सनी सेंटरमधील फ्लॅटवर आल तर मावसभाऊ अक्षय दुकानाच्या वरच्या रूममध्ये झोपी गेला. सकाळी १० ला दुकान उघडण्यासाठी आला त्याला मागील दरवाजा उचकटलेला दिसला. सिडको पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.