कारखानदारांचा माज स्वाभिमानी शेतकरी संघटना उतरवेल
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी /राजेंद्र उंडे
जिल्ह्यातील सर्वच पांढरपेशी नेते हे शेतकऱ्यांच्या उसावर दरोडे टाकत आहेत. त्यांच्या टोळ्या वेगवेगळ्या आहेत, मात्र टोळी धोक्यात आली की, सर्वच एकत्र होतात त्यांच्या तिसऱ्या पिढ्याही आता सक्रिय झाल्या आहेत आणि शेतकऱ्यांना लुटत आहेत. थोरात, विखे, तनपुरे, गडाख,काळे, कोल्हे हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत.जिल्ह्यातील कारखानदारांना माज आलाय स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांचा माज उतरवेल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाॅ येथे मंगळवारी सायंकाळी ऊस परिषद संपन्न झाली. त्यावेळी राजू शेट्टी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रावसाहेब करपे होते. तर व्यासपीठावर स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, संघटनेचे अध्यक्ष प्रा. संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, युवक जिल्हा अध्यक्ष प्रकाश देठे, सतिष पवार, जितेंद्र भोसले, वंचितचे चोळके, पिंटू साळवे, बाळासाहेब जाधव,अमृत धुमाळ आदि होते.
यावेळी खा.राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्रातील बहुतेक साखर कारखाण्याचे धुराडे पेटले असून यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळत नाही.शेतकऱ्यांच्या एफआरपी अधिक दर मिळावा, कारखाना वजन काटे ऑनलाईन करावेत, शेतक-यांची लुट थांबावी यासाठी लवकरच साखर आयुक्तांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यात मला राजकारण करायचे नाही मात्र या जिल्ह्यातील सर्वच पांढरपेशी नेते हे शेतकऱ्यांच्या उसावर दरोडे टाकत आहेत. त्यांच्या टोळ्या वेगवेगळ्या आहेत मात्र टोळी धोक्यात आली की, सर्वच एकत्र होतात त्यांच्या तिसऱ्या पिढ्याही आता सक्रिय झाल्या आहेत आणि शेतकऱ्यांना लुटत आहेत. थोरात, विखे, तनपुरे, गडाख,काळे, कोल्हे हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत. वजन काट्यामध्ये सर्वच कारखानदार हे शेतकऱ्यांचा काटा मारतात म्हणून साखर कारखान्याचे वजन काटे हे ऑनलाईन व्हावेत ही स्वाभिमानीची प्रमुख मागणी आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी अक्षरश: उध्वस्त झाला आहे. मात्र हे सरकार कोर्टात हेलपाटे घालण्यात मग्न आहे या सरकारला शंभर दिवस पूर्ण झालेत मात्र नको ते निर्णय घेताना ते दिसतात तर शेतकऱ्यांना मदतीबाबत अद्याप सरकार शांत आहे.दुसरीकडे विरोधी पक्ष देखील याबाबत अन्नभिन्न असल्याने राज्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्यामुळे या सरकारला वठणीवर आणण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
माजी खा.राजू शेट्टी म्हणाले की, ऊस उत्पादक मोठ्या कष्टाने ऊसाची शेती करतो परंतू शेतकऱ्यांच्या उसावर साखर कारखानदार दरोडे टाकत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांना माज आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांचा माज उतरवेल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
राहुरीत दोन्ही दादांनी शेतकऱ्यांची वाट लावली..,तनपुरे-विखेंवर मोरेंचा अप्रत्यक्ष घनाघात
राहुरीतील ऊस उत्पादक शेतकरी हा केवळ २१०० रुपये भाव घेतो ही लाजिरवाणी गोष्ट आहे. दीडशे किलोमीटर दूर असलेला दौंड शुगर साखर कारखाना हा २९२५ रूपये भाव देतो. आणि आपण मी अमुक दादाचा..,, मी तमुक दादाचा कार्यकर्ता म्हणून मिरवतो मात्र या दादांनी आपली पुरती वाट लावली आहे. एक दादा २१०० रुपये भाव देतो तर दुसरा दादा २३०० रूपये भाव देतो, या दादांना थोडीफार लाज वाटली पाहिजे.असे विखे तनपुरे यांचे नाव न घेता टिका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना यापुढे कोणाचीही गय करणार नाही. आता आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. असा घनाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या टाळूवरचे खाणाऱ्यांचा स्वाभिमानी ठोकणार!
महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी अधिका-यांनी पैशाची मागणी करणे म्हणजे मेलेल्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्यासारखा प्रकार आहे. सदर घटना हि अत्यंत संतापजनक असून अतिशय निंदनीय आहे. हा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात असाच सुरू आहे.ज्यांना सातवा वेतन आयोग मिळतो त्यांना कर्तव्य करण्यासाठी अशी भीक मागण्याची गरज नाही. कर्तव्य करण्यासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर स्वाभिमानी त्यांना नागडे करून ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.