जि.प सदस्य सिताराम राऊत यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ घुलेवाडीत कडकडीत बंद ; 

0

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

संगमनेर : काँग्रेस पक्षाचे घुलेवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिताराम पुंजाजी राऊत यांना सोमवारी घुलेवाडीत दोन महिला आणि दोन पुरुषांनी केलेल्या मारहाणीचा घुलेवाडीत काल मंगळवारी कडकडीत बंद पाळून निषेध करण्यात आला. तसेच  घुलेवाडी फाट्यावर निषेध सभा घेऊन याबाबतचे निवेदन शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना देण्यात आले.

        घुलेवाडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांना कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग, (रा. घुलेवाडी) आणि भारत संभाजी भोसले रा.( कोंची ता. संगमनेर) यांनी सोमवारी घुलेवाडी ग्रामपंचायत समोर मारहाण केली होती तसेच भारत भोसले याने या घटनेचा व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमावर व्हायरल केला होता. या सर्व घटनेचा व राऊत यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ काल मंगळवारी घुलेवाडीतील किरकोळ व ठोक विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला. काल मंगळवारी सकाळी दहा वाजता घुलेवाडी ग्रामपंचायत समोर घुलेवाडीतील सुमारे हजार पंधराशे ग्रांमस्थ व छोटे-मोठे व्यापारी जमले होते. तेथून ते चालत अत्यंत शांततेच्या मार्गाने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या घुलेवाडी फाट्यावर जमा झाले. तेथे निषेध सभा झाली. या निषेध सभेत अनेक वक्त्यांनी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून सिताराम राऊत यांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी अमृतवाहिनी सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब राऊत, संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, घुलेवाडीच्या माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई गुंजाळ, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील राऊत, अनिल राऊत, आयपीआयचे खरात, राजू आव्हाड, मातंग एकता संघटनेचे ज्ञानेश्वर राक्षे, शिवसेनेचे रवींद्र गिरी, घुलेवाडीचे सरपंच दत्तात्रय राऊत, उपसरपंच हरिभाऊ ढमाले, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पानसरे, व्हा. चेअरमन सचिन राऊत, आदी सह सुमारे हजार ते पंधराशे नागरिक यावेळी उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी याबाबतचे सविस्तर निवेदन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना देऊन आरोपीवर त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान सोमवार (दि.१९) सायंकाळी घुलेवाडीतील ग्रामस्थांनी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम यांना निवेदन देऊन या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here