ज्यांच्या आमदारकीची जबाबदारी घेतली त्यांचा इतिहास तपासा प्राजक्त तनपुरे: सुजय विखे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

       नगर-मनमाड रस्त्याच्या प्रश्नाला बगल देत टक्केवारीचा आरोप खा. डॉ. सुजय विखे करीत आहेत. दुसऱ्यांवर व गुन्हेगारी दडपशाहीचा आरोप करण्यापूर्वी पक्षाचे दडपण घेऊन ज्यांना आमदार करण्याची शपथ घेत आहात त्यांच्या इतिहासाचे वाचन करा. प्रशासनाचा वापर आम्ही नेहमीच जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी केला, राजकीय नाही, तुम्ही प्रशासनाचा वापर कशासाठी करता हे सर्वांना माहित आहे. अशा शब्दात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी खा. सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना प्रत्युत्तर दिले.

         आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार तनपुरे म्हणाले, अडीच वर्षांच्या कालखंडात कधीही कोणावर अन्याय केला नाही. प्रशासनाचा कधी गैरवापर केला नाही. त्याउलट सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील  अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा साधत योग्य तेच निर्णय घेतले. खा. डॉ. विखे बेतालपणे आरोप करीत आहेत. गुन्हेगारी, अधिकाऱ्यांचा गैपवापर, असे आरोप करताना तुम्ही शेजारीच बसलेल्या माजी लोकप्रतिनिधींचा इतिहास पाहणे गरजेचे होते. खा. विखे यांनी माझ्यावर टीका करणे धोरणात्मक होते. परंतु वडीलधाऱ्या व्यक्तींचा मानसन्मान विसरून त्यांनी माझे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यावर टीका केल्याचे शल्य वाटते. आम्ही कधीही शासकीय अधिकाऱ्यांचा वापर राजकीय ताकद दाखविण्यासाठी केला नाही. शासकीय अधिकाऱ्यांचा वापर कोण करतो हे सर्वांना माहिती आहे.हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यकाराची गरज नाही. त्याउलट सत्काराचा कार्यक्रम कार्यकर्त्यांचा असताना तुम्ही संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांनाही वेठीस धरले. अधिक संख्या दाखविण्यासाठी कोणत्या संस्थेचे किती अधिकारी व कर्मचारी आपण सत्कारासाठी बसवून ठेवले याची माहिती आम्हाला आहे. दीड हजार शासकीय अधिकारी कर्मचारी नसते तर तेवढ्या खुर्च्या रिकाम्याच राहिल्या असत्या, असा टोला लगावला.

         माजी आमदार कर्डिले यांनी आपल्या कार्यकाळात एकही पाणी योजना सुरू केली नाही. आम्ही केवळ अडीच वर्षात वांबोरी व ब्राह्मणीसह अनेक पाणी योजनांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. दहा वर्षे लोकांना झुलवत ठेवणाऱ्या माजी आमदार कर्डिले यांना जनतेने जागा दाखवून दिली असे ते म्हणाले.

चौकट 

…तर राजकारणातून थांबा घेईन

          नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी खा. विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे सोडून टक्केवारी मागितल्याचे आरोप सुरू केले आहेत. मी एक पैसाही घेतल्याचे सिद्ध केल्यास तत्काळ राजकारणातून थांबा घेईन, खोटे आरोप करण्यापेक्षा केंद्राकडून नगर-मनमाड रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा. असे आवाहन आ. प्राजक्त तनपुरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here