संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील
भरधाव जाणाऱ्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. तर एक मुलगी गंभीरित्या जखमी झाली. सदरची घटना कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील वडगावपान फाट्यावर गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. अपघातात ठार झालेले दोघे सख्खे मावसभाऊ असल्याचे समजते.
तालुक्यातील वडगाव लांडगा येथील सुनील जालिंदर लांडगे हे आपला मावसभाऊ अक्षय तात्यासाहेब रोकडे आणि मावस बहीण कावेरी तात्यासाहेब रोकडे (मुळगाव दुर्गापूर ता.राहाता हल्ली रा.वडगाव लांडगा) यांच्यासह कोल्हार-घोटी राज्य मार्गावरून मोटार सायकल क्रमांक एम.एच १५ बी.एफ ९३८७ वरून राहाता येथील न्यायालयात तारखेसाठी जात होते. ते वडगावपान फाट्यावर आले असता पाठीमागून आलेल्या विना नंबरच्या डंपरने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत डंपरच्या चाकाखाली येऊन सुनील जालिंदर लांडगे आणि अक्षय तात्यासाहेब रोकडे हे दोघे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले तर कावेरी तात्यासाहेब रोकडे ही गंभीरित्या जखमी झाली. अपघात झाल्यावर डंपर चालक डंपर घटनास्थळी सोडून पसार झाला. अपघात घडल्यानंतर वडगावपान फाट्यावरील नागरिकांनी रुग्णवाहिकेला तसेच पोलिसांना फोन करून माहिती दिली. या अपघाताची माहिती समजल्यावर स्वाभिमान मंडळाचे नेते शरद नाना थोरात आणि रहीमपूरचे माजी सरपंच शांताराम शिंदे, पोपट सोपान गुळवे, सुनील भाऊसाहेब गुळवे यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि मृताच्या नातेवाईकांना आधार देऊन पुढील कायदेशीर सोपस्कार पार पाडण्यासाठी मदत केली. दरम्यान अपघातात ठार झालेल्या सुनील लांडगे आणि अक्षय रोकडे या दोघा मावस भावांवर शोकाकुल वातावरणात वडगाव लांडगा येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. एैन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताबाबत श्रीकांत विनायक लांडगे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात डंपर चालका विरोधात गुन्हा रजि.नं ४४५/२०२२ भा.द.वि कलम ३०४(अ), २७९, ३३७,३३८, ४२७ मोटर वाहन कायदा कलम १८४,१३४ अ,ब/ १७७ प्रमाणे दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ एल.एम औटी करत आहेत.
अपघातात ठार झालेला अक्षय रोकडे आणि जखमी झालेली त्याची बहीण कावेरी या दोघांचे आई-वडील हयात नसल्याने ते दोघे गेल्या अनेक वर्षांपासून वडगाव लांडगा येथे मावशीकडे राहत होते. मावशी आणि मावस भाऊ त्यांचा सांभाळ करत होते. अक्षय रोकडे याचे दुर्गापूर येथील जमिनी संबंधी राहाता न्यायालयात तारीख होती आणि या तारखेलाच जात असतानाच त्यांचा अपघात झाला. ठार झालेले सुनील लांडगे आणि अक्षय रोकडे हे रहिमपूर येथील पोपट सोपान गुळवे आणि सुनील भाऊसाहेब गुळवे यांचे भाचे होते. त्यामुळे वडगाव लांडगा, दुर्गापुर आणि रहिमपूर येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.