डॉ. संजीव माने व श्री. बाबासाहेब भोसले हे आहेत नोव्हेंबर महिन्याचे महात्मा फुले कृषि

0

विद्यापीठाचे आयडॉल्स

राहुरी विद्यापीठ, दि. 1 नोव्हेंबर, 2022
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून मफुकृवि आयडॉल्स हा उपक्रम गतवर्षी सुरु झालेला आहे. नोव्हेंबर महिन्यातील महात्मा फुले कृषि
विद्यापीठाचे शेतकरी आयडॉल म्हणुन कृषिरत्न डॉ. संजीव माने व कृषि उद्योजक म्हणुन बाबासाहेब भोसले यांची निवड झालेली आहे.
डॉ. संजीव माने हे मु.पो. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली येथील शेतकरी असून कृषि पदवीधर बाबासाहेब भोसले हे मु. बिरेवाडी, पो. मांडवे बु., ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथील कृषि उद्योजक आहेत. शेतकरी आयडॉल डॉ. संजीव माने यांनी उसामध्ये पंचसुत्रीचा वापर केलेला आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी उभी आडवी नांगरट, कुळवणी, कंपोस्ट खत 15 टन व जिवाणुंची 3 वेळा आळवणी केली आहे. ऊस लागवडीसाठी 5 फुट सरी, एक डोळा, बीजप्रक्रिया करुन सरीत आडवे दिड फुटांवर लागण करुन माती परिक्षणानुसार नत्र 280 किलो, स्फुरद 150 किलो, पालाश 150 किलो, सुक्ष्म अन्नद्रव्ये 30 किलो, गंधक 30 किलो, मॅग्नेशिअम सल्फेट 50 किलो, कॅल्शिअम 50 किलो प्रति एकर प्रमाणे रासायनिक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करुन उसाच्या एकरी उत्पन्न वाढीचा उच्चांक केला आहे. त्यांनी महाराष्ट्रासह विविध राज्यात 2400 पेक्षा अधिक व्याख्यानांद्वारे तसेच व्हाट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे. कृषि उद्योजक बाबासाहेब भोसले यांनी पुणतांबा येथील कृषि तंत्र विद्यालयातुन कृषि पदविकेचे शिक्षण घेतलेले आहे. बाबासाहेब भोसले यांनी सुरुवातीला कृषि सेवा केंद्राच्या माध्यमातून उद्योगाला सुरुवात करुन हायटेक नर्सरी, फर्टीलायझर कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी तसेच ग्रीनपर्ल इंडस्ट्रीज इ. उद्योगांची स्थापना करुन यशस्वी उद्योजक म्हणुन नावलौकीक मिळविला आहे व परिसरातील शेतकर्‍यांच्या विकासात भर घातली आहे. त्यांनी ठिबक सिंचन, अत्याधुनिक मशिनरी, सेंद्रिय शेती, माती पाणी परिक्षण या विषयावरील प्रत्यक्ष प्लॉट पाहणीसाठी शेतकर्‍यांना राज्याच्या विविध भागात स्वखर्चाने सहलींचे आयोजन केले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या विविध उद्योगात 90 पेक्षा जास्त कायमस्वरुपी कर्मचारी व 25 ते 30 हंगामी कर्मचारी काम करीत आहेत. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रदर्शीत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here