देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
उच्च् न्यायालयाने ३० सप्टेंबर पर्यंत डॉ. बाबा तनपुरे कारखान्याच्या कामगारांचे थकित देणे देण्याचे आदेश दिल्याने संचालक मंडळाने कारखान्याच्या जमिनी विक्रीस काढल्या आहेत. मात्र यामागे कामगारांचे हित नसून केवळ मंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांच्या हस्तक्षेपामुळे हा जमिन विक्रीचा घाट घातला असून यातीलच काही राजकीय मंडळींना या जमिनीविकत घ्यायच्या असल्याचा आरोप रामदास धुमाळ विचार मंचचे अध्यक्ष अमृत धुमाळ यांनी केला आहे.
विशेष म्हणजे सर्व गट नं. सर्व प्रॉपर्टी विकून देखील कामगारांची देणे फेडली जाऊ शकत नाही तसेच जिल्हा बँकेने सरफेसी ॲक्टनुसार दिलेली कर्ज रुपये 110 कोटी रुपये कारखाना परतफेड करू शकत नाही. तसेच कारखान्यावर इतर वित्तीय संस्थाचे इतर असलेली देणे याचा विचार करता सभासदांच्या घामाच्या कष्टातून उभा राहिलेला राहुरी कारखाना केवळ राजकीय हव्यासापायी पूर्णपणे कोलमडून पडल्याचे चित्र आहे. कारखाना हा खाजगी मालमत्ता मध्ये रूपांतरित करण्यासाठी काही राजकीय लोकांनी घाट घातलेला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांचे देणे कारखाना प्रशासनाकडून थकविण्यात आले होते. याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका कामगारांच्यावतीने दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी होऊन खंडपिठाने जिल्हाधिकाऱ्यांना वसुली करून कामगारंची कोट्यवधी रूपयांची थकित देणी देण्याचे आदेश दिले.
ही देणी देण्यासाठी संचालक मंडळाने बैठक घेऊन देवळाली प्रवरा गट नं. ४७८/२/२/२, ४७८/२/१, ४८०/१, ५३४, ५३५/६, ४७१/१, ४७२, ४७४, ४७७,५३५/१, १३१२/२/१/९, १३१२/२/२/२, १३१३, ४७१/२, ४७१/३, ४७३, ४७५, ४७६, ५४२, ४७८/१ या जमिनी विकण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय घेण्यामागे राजकीय स्वार्थ लपल्याचा दिसून येत आहे. लिलावाच्या नावाखाली राजकीय नेते आपले हस्तक नेमून या जमिनी आपल्याच घशात घालण्याचे शडयंत्र रचीत असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
विखे पिता-पुत्रांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने अति घाईने लिलावाची प्रक्रिया करून आपले हित साधण्याचे षडयंत्र रचले आहे. कारखाना वाचवायचं असेल तर सर्व सभासद व कामगार संघटित होऊन लढा उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे कारखाना बचाव कृती समिती स्थापना करून सर्व समाजातील सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन कुठल्याही शक्तीला बळी न पडता संघटितपणे लढा उभारण्याचे आवाहन अमृत धुमाळ यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.