संगमनेेर : पालकांनी मुलींप्रमाणेच मुलांनाही सांभाळले पाहिजे. चांगला समाज व चांगल्या भारतासाठी मुले, मुली दोन्हीही समान असून तरुण-तरुणींनी आपली आवड ओळखून आवडीच्या क्षेत्रात करिअरसाठी संधी शोधावी. यामुळे जीवनात यशस्वीते बरोबर आत्मिक समाधान मिळेल असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात एकविरा फाउंडेशनच्या वतीने घेे भरारी या प्रेरणादायी संवादात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात होते. तर व्यासपीठावर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड, लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर ,नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे ,कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, डॉ हसमुख जैन, सौ.शरयुताई देशमुख उपस्थित होते.
यावेळी संगमनेर मधील युवकांशी संवाद साधताना डॉ. माधुरी कानिटकर म्हणाल्या की, आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत. पालकांनी मुलांना ही मुलींप्रमाणेच सांभाळले पाहिजे. समाज व देशाच्या प्रगतीसाठी मुले व मुली दोनही गरजेचे आहे. पालकांनी सातत्याने मुलांशी संवाद करावा. मुलांच्या आवडीचे क्षेत्र ओळखून त्यांना त्या क्षेत्रात करिअरच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित करावे.तसेच देशसेवा ही प्रत्येक क्षेत्रात आहे असे समजून तरुण तरुणींनी काम केले पाहिजे. आपण जेथे काम करतो ते काम प्रामाणिकपणे करा.यशस्वी होण्याकरीता स्वतःमध्ये आत्मविश्वासाबरोबर अनुशासन असायला पाहिजे. प्रतिकूलता ही आता कारण असू शकत नाही. स्पर्धेत टिकायचे असेल तर तुम्हाला नवीन काहीतरी करावे लागेल.संस्कार घेऊन आपला देश पुढे जात असून कोरोना काळात प्रत्येक माणूस सैनिक म्हणून लढला.असाच मानवतेचा धर्म वाढवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण जो निर्णय घेतला आहे.त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जे काही करणार असाल ते मनापासून करा. स्वतःची ध्येय ठरवा. पैसा व प्रसिद्धी साठी काम न करता आत्मिक समाधानासाठी काम केले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये ही मोठी गुणवत्ता असून स्पर्धा परीक्षांमधून आता ग्रामीण भागातील मुले जास्त पुढे येत आहे. गुणवत्ता असलेल्या तरुणांना नक्कीच मोठे भविष्य असल्याचे ही त्या म्हणाल्याा.
आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतामध्ये तरुणांची मोठी संख्या आहे.या तरुण शक्तीच्या हाताला काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे. आज मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी तरुण विविध परीक्षा देत आहेत. मात्र त्या परीक्षेत अपयश आले तर त्या तरुणाची व कुटुंबाची मानसिक अवस्था खचते. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी सरकारने काम केले पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर शहर व तालुक्यातील हजारो युवक युवती उपस्थित होत्या.
चौकट :- प्रश्न उत्तरातून संवाद
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर व डॉ. लिना बनसोड यांनी संगमनेर मधील तरुणाईशी थेट संवाद साधला. यावेळी विविध महाविद्यालयीन युवक, युवतींनी सैन्य भरती,बेरोजगारी ,स्पर्धा परीक्षा, करिअर, समाजातील बंधने या विविध विषयांवर प्रश्न विचारले या सर्व प्रश्नांना डॉ. कानिटकर व डॉ. बनसोड यांनी अत्यंत मनमोकळेपणाने उत्तरे दिली.