थोरात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान

0

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर मागील ५६ वर्षात यशस्वी वाटचाल करताना थोरात कारखान्याने देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. या उज्वल परंपरेसह ऊस उत्पादक व कामगारांचे हित जपताना या दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे कारखान्याच्या वतीने सर्व कामगारांना २०% बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.
             सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. अध्यक्षस्थानी चेअरमन बाबा ओहोळ होते. तर व्यासपीठावर आ. डॉ सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे ,बाजीराव पा.खेमनर, माधवराव कानवडे ,इंद्रजीत थोरात ,डॉ. जयश्रीताई थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे ,सर्व संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर होते.
            यावेळी बोलताना  आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोरात कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करतांना मागील ५६ वर्षात अत्यंत यशस्वी वाटचाल केली असून काटकसरीतून हा कारखाना प्रगतीपथावर नेला आहे. देशपातळीवरचे अनेक पुरस्कार या कारखान्याला मिळालेले आहेत. नवीन कारखान्याच्या उभारणीसह अनेक धोरणात्मक निर्णयामुळे इतरांसाठी मार्गदर्शक असणाऱ्या या कारखान्याने मागील हंगामात १५ लाख ५३ हजार मॅट्रिक टनाचे उच्चांकी गाळप केले आहे. दीपावली निमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रोत्साहन पर १७६ रुपये प्रति मे. टन अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे .या अनुदानाचे १४ कोटी रुपये, ठेवीवरील व्याज २ कोटी रुपये व कर्मचाऱ्यांच्या बोनसचे १० कोटी रुपये असे एकूण २६ कोटी रुपये कारखान्याच्या वतीने दीपावली निमित्त बाजारात येणार असल्याचे ते म्हणालेे.कारखान्याने कामगारांचे हित जोपासताना त्यांचा  विमा व विविध योजनांसह दरवर्षीप्रमाणे कर्मचाऱ्यांना २०% बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे.यामुळे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून थोरात कारखाना, दूध संघ व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पेमेंट नंतर संगमनेरची बाजारपेठ फुलणार असल्याने सर्व व्यापारी बांधवांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here