दक्षिण कोरिया: सोलमध्ये हॅलोविनदरम्यान 151 जणांचा गुदमरून मृत्यू

0
दक्षिण कोरिया, सोल, आरोग्य, कार्डिअक अरेस्ट

सोल : दक्षिण कोरियाची राजधानी सोल येथे शनिवारी (29 ऑक्टोबर) हॅलोविनचा सण साजरा करत असताना जमलेल्या गर्दीमुळे गुदमरून मृत्यू अनेकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश तरुण आणि किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर हजारो जण बेपत्ता असल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
मृतांमध्ये 19 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी तीन जण हे चीनचे नागरिक असल्याचे शिनुआ वृत्तसंस्थेनी म्हटले आहे. काही जणांचा चेंगराचेंगरीमुळे, तर काही जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. गर्दीमुळे काही जणांना कार्डिअॅक अरेस्टही झाल्याचे काल म्हटले गेले होते.

राष्ट्राध्यक्ष यून सूक योल यांनी आपात्कालीन विभागाच्या चमूला घटनास्थळी पाचारण तातडीने पाचारण केले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार होत आहेत. सोलमधील इतावून या भागात ही घटना घडली. हा भाग सणावाराच्या काळात गजबजलेला असतो.
ही घटना अतिशय दुःखद असून या धक्क्यातून सावरणे कठीण असल्याचे राष्ट्राध्यक्ष योल यांनी म्हटले आहे.

2900 हून अधिक बेपत्ता

या दुर्घटनेनंतर अंदाजे 2900 जण बेपत्ता असल्याची माहिती हन्नाम डॉंग कम्युनिटी सर्व्हिस या स्वयंसेवी संस्थेनी दिली.

या दुर्घटनेनंतर हन्नाम डॉंग कम्युनिटी सर्व्हिस ही संस्थाना बेपत्ता लोकांना शोधण्याचे काम करत आहे. हॅलोविनच्या कार्यक्रमाला गेलेले पण घरी न परतलेल्या सदस्यांबाबत विचारणा करण्यासाठी अनेक जण या संस्थेच्या केंद्रावर येत आहे. आपले नातेवाईक याच ठिकाणी परततील या आशेवर अनेक जण केंद्रातच बसले आहेत. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच नो मास्क हॅलोवीन साजरा करण्यासाठी या परिसरात लाखभर लोक जमले होते. सोल शहरातले रस्ते हॅलोवीन साजरा करणाऱ्या नागरिकांनी फुलले होते.

ही घटना कशी घडली?
सोलमध्ये इतावून नावाचा परिसर आहे. या ठिकाणी हॅलोविनसाठी गर्दी जमा झाली होती. या परिसरात लाखाहून अधिक लोक आले होते. या ठिकाणच्या गल्ल्या अरुंद आहेत. त्यात चेंगराचेंगरी झाली आणि लोक गुदमरून गेले.
गर्दी इतकी वाढली होती की लोक अक्षरशः लोकांना तुडवत आपला रस्ता शोधू लागले होते असे पॅरामेडिक कर्मचाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावर दिसणाऱ्या फोटोत रस्त्यावर मृतदेह असल्याचं दिसत आहे. आपात्कालीन विभागाचे कर्मचारी आणि अन्य नागरिक रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या नागरिकांवर उपचार करत होते. डॉक्टरांनी सांगितले की सुरुवातीला केवळ एक दोन लोकांना सीपीआर द्यावे लागले. पण बघता बघता गुदमरून अस्वस्थ झालेल्या लोकांच्या संख्या वाढली.

जगभरातील नेत्यांकडून शोक संदेश
या घटनेनंतर जगभरातील नेत्यांनी दक्षिण कोरियाला सांत्वनपर संदेश पाठवले आहेत.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी म्हटले आहे की, “दक्षिण कोरियाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कॅनडियन जनता तुमच्यासोबत आहे. दक्षिण कोरियात झालेली चेंगराचेंगरी दुर्दैवी आहे. जखमींच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना मी करतो.”

युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही दक्षिण कोरियातील जनतेच्या दुःखात सहभागी आहोत, असं ऋषी सुनक यांनी म्हटले आहे.

सोलची घटना जगातील सर्वाधिक दुर्दैवी घटनांपैकी एक
गेल्या दशकभरात जगभरात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या सर्वांत दुर्दैवी घटनांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.

*2015 साली सौदी अरेबियातील मक्का येथे हज यात्रेसाठी आलेल्या भाविकांची गर्दी जमली होती. यावेळी किमान 2000 जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त होते.
*गेल्या महिन्यातच इंडोनेशियातील पूर्व जावातील मलंग फुटबॉल मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत 130 जणांचा मृत्यू झाला होता.
*2013 साली मध्य प्रदेशात दातिया या ठिकाणी नवरात्रीच्या उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 115 जणांचा मृत्यू झाला होता.
*2005 साली सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here